
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी
दसरा सण साजरा करून गाढ झोपेत असलेल्या तेरा वर्षे चिमुकलीला विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ढाणकी येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी परमेश्वर भूसावळे ही मुलगी रात्री दसरा सण साजरा करून जेवण आटोपल्यानंतर आपल्या घरी आई-वडिलांसोबत झोपली होती, मध्यरात्रीच्या सुमारास तिला आपल्याला काहीतरी चावले असा भास झाला आणि तिने आपल्या आई वडिलांना उठवले. पालकांना वैष्णवीला साप चावल्याचे लक्षात येताच तिला ढाणकी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथेच तिची प्राणज्योत मावळली. वैष्णवीच्या अशा अकाली जाण्याने ढाणकी मध्ये शोककळा पसरली होती. याबाबत रीतसर तक्रार बिटरगाव पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे.
