
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
दिवाळी आधी अतिवृष्टी अनुदान मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू या वलग्ना फोल ठरल्या. आनंदाचा शिधा देखील कामी पडला नाही. प्रशासनाने कार्यप्रवणता दाखविल्याने काही शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळाली मात्र राळेगाव तालुक्यातील बँके समोर अजूनही या करीता असणारी गर्दी ओसरलेली नाही. मुळात पर्यावरण असमतोलाने बदललेल्या नैसर्गिक ऋतुचक्र|चा फटका बसला की खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून जबाबदारी झटकने हा एकमेव मार्ग उरला का ? याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.
विदर्भाच्या एकूण अर्थव्यवस्थेतील साठ टक्के वाटा हा कृषी क्षेत्रातून येतो. यंदा अतिवृष्टी ने यावर पाणी फेरले आहे. कोणत्याही शिवारात गेलें की करपलेली कपाशी, जळलेली तूर व हताश शेतकरी हे चित्र सार्वत्रिक आहे. राळेगाव तालुक्यात जुलै महिन्यातील 17 तारखेपासून जो पाऊस झाला त्याने अक्षरशः तालुक्याला झोडपून काढले. नदी, नाल्याला पूर आल्याने शेतीचे व गावात पाणी शिरल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने भेटी चे सोपस्कार पूर्ण केले. विरोधी पक्षाने सरकार वर ताशेरे ओढले. तुटपुंजी मदत आली. कुणाला मिळाली कुणाला मिळाली नाही. मात्र हा प्रश्न केवळ मदतीने सुटणार नाही.
गेल्या दशकभरात निसर्ग बदलला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होतांना दिसते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. या बाबत शासकीय पातळीवर ऋतुचक्रतील बदलावर यंत्रणानी अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्याची, मदत करण्याची गरज आहे. पारंपरिक शेती पद्धतीत बदल हा एक मार्ग होऊ शकतो. मात्र या करीता शासन पाठीशी असले तरच शेतकरी तग धरू शकतील. झाले नुकसान की दे मदत हे अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर कामाचे नाही. सरकार नावाच्या व्यवस्तेतील यंत्रनेला अधिक गांभीर्याने या कडे लक्ष दयावे लागेल. या अल्पशा मदतीने वेळ मारून नेल्याचे समाधान मानून घेता येईल मात्र पारंपरिक शेती ला नैसर्गिक आपत्तीचे हे जोरदार धक्के या पुढे सहन होणार नाही. दीर्घकालीन उपाययोजना राबवूनच यावर मात करता येऊ शकते. शासनाकडे ही दृष्टी व प्रामाणिक नियत आहे का हा खरा सवाल आहे. टिकेचे लक्ष होऊ नये म्हणून मदतीस अपात्रचा सिक्का
राज्यात 36 लाख हेकटरमधील पीक यंदा च्या अतिवृष्टीने बाधित झाले. यात 20 हजार हेकटर अर्थात निम्यापेक्षा जास्त क्षेत्र विदर्भातील आहे. राळेगाव तालुक्यातील 13 हजार हेकटर क्षेत्रातील पिके खरडून गेली. यातून शेतकरी आत्महत्याचा उद्रेक झाला. राळेगाव तालुक्यात अतीवृष्टी नंतर जुलै ते नोव्हें 2022 या पाच महिन्यात 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला. दीड दशकाआधी शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय वाटायचा आता शासन प्रशासन व जनता या तिन्ही घटकांनी या आत्महत्या अपरिहार्य म्हणून स्वीकारले की काय असे म्हणावे लागेल इतके दुर्लक्ष या कडे आहे. जिल्हात एकट्या ऑगस्ट महिन्यात शेतकरी आत्महत्या च्या घटनांनी अर्धशतक गाठले. पात्र व अपात्र आत्महत्या हे वेगळेच गौडबंगाल हे म्हणावे लागेल. टिकेचे धनी होऊ नये म्हणून मदतीस अपात्र हा सिक्का मारला जातोय.
कृषी धोरणात बदल करण्याची नितांत गरज
बदललेल्या ऋतुचक्र|मुळे नापिकी त्यातून नैराश्य व त्याचे पर्यवसान शेतकरी आत्महत्येत होतं आहे. यातून बाहेर पडन्याकरीता कृषी धोरणात आमुलाग्र बदल करण्याची नितांत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती वर मात करण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. पुढील काळात विविध नैसर्गिक संकटाचा सामना शेतकर्याना करावा लागणार असण्याची चिन्हे दिसतं आहे. निव्वळ तुटपुंजी मदत देण्याने हा प्रश्न सुटणार नाही. या मलमपट्या ठरतील पी हळद हो गोरी हा याचा इलाज नाही.
