
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
जे पाणी आपण डोळे मिटून पितो ते किती प्रमाणात शुद्ध असते, याची तपासणी करणारी कोणतीच यंत्रणा सध्या कार्यरत नसल्यामुळे प्रसंगी हे जीवन कधी माणसाला मरणाच्या खाईत तर ढकलणार नाही ना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. आजकाल शहरातच नाही तर ग्रामीण भागातही शुद्ध पाण्याच्या कॅनचा सर्रास वापर केला जात आहे. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमांपासून तर अनेक कार्यालयांमध्ये आता शुद्ध आणि आहे. थंड पाणी देणाऱ्या कॅनची मागणी वाढल्याने त्याची निर्मिती करणारेही वाढले आहेत.
५-६ वर्षांपूर्वी कॅनमधील पाणी केवळ शहरी भागातच एखाद्या समारंभात वापरले जात होते; पण आता ग्रामीण भागातही सर्रास कोणत्याही कार्यक्रमात पाण्याच्या कॅन पहायला
मिळतात.मागणी वाढल्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा करून ते पाणी शुद्ध व थंड करणारे आरओ प्लान्ट ठिकठिकाणी लागले आहेत. वास्तविक पाणी हा अन्नघटक असल्यामुळे त्याची व्यावसायिकपणे विक्री करताना अशा आरओ प्लान्टमध्ये शुद्धतेच्या मानकांचे पालन किती प्रमाणात होते, याची तपासणी होणे गरजेचे आहे; परंतु तपासणी तर दूरच, या पाण्याचे नमुनेही अन्न प्रशासन विभागाकडून आता घेतले जात आहे की नाही ही बाब अनुत्तरीय आहे.
राळेगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी शुद्ध आणि थंड पाण्याच्या कॅनचा व्यवसाय वाढला आहे. जमिनीत बोअर मारून पाणी काढून ते छोट्याशा जागेत उभारलेल्या शुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध व थंड करून त्या कॅनची विक्री केलीजाते. उन्हाळ्याच्या दिवसांत या थंड पाण्याला भरपूर मागणी असली तरी ते पाणी अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार किती शुद्ध असते, याची शाश्वती देणारे कोणतेही परिमाण सध्या तरी उपलब्ध दिसून येत नाही.
अन्न प्रशासन विभागाने या पाण्याचे काही नमुने गोळा करून शुद्धता तपासणीसाठी नियमितपणे प्रयोगशाळेत पाठविले पाहिजे मात्र या विभागावरही मर्यादा घालण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे आता हे पाणी कसेही असले तरी त्याची शुद्धता तपासणीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही महत्त्वाचे म्हणजे शील बंद बाटल्यांचा व्यवसाय नियम धाब्यावर बसविले जात आहे
सध्या एक लिटर पाण्याची २० रुपयांची किंवा अर्धा लिटर पाणी १० रुपयांची पाण्याची बाटली सहज उपलब्ध असते. त्यामुळे चहा-
नाष्टा केल्यानंतर लोक सर्रास पाण्याची बाटली विकत घेऊन ते पाणी पिणे पसंत करतात; परंतु ते बाटलीबंद पाणीही किती शुद्ध असते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात सीलबंद बाटल्यांच्या विक्रीचे नियम धाब्यावर बसवून विक्री वाढली आहे. सीलबंद पाण्याची बाटली विकताना त्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार परवाना क्रमांक, बीआयएस परवाना नंबर, बॅच नंबर, निर्मितीची (पॅकिंग) तारीख, किती कालावधीत वापरणे योग्य आहे आदी बाबी नमूद करणे आवश्यक आहे. मात्र येथील काही हॉटेल्समध्ये काही कंपन्यांच्या बाटल्यांवर निर्मितीची तारीखच नमूद राहत नाही. डॉ नेहमी सांगतात की बाटलीचे थंड पाणी पिणे टाळावे परंतु नागरिक या गोष्टीकडे दुर्लक्ष करून थंड पाणी पितात त्यामुळे या पाण्यापासून अनेक आजाराला समोर जावे लागत आहे.
सीलबंद नाही
कॅनमधील पाणी हे सीलबंद राहात नसल्यामुळे ते अन्न सुरक्षा कायद्याच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्न प्रशासन विभाग कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. अगोदरच त्यांच्याकडे मनुष्यबळाची मोठी समस्या आहे.
नियम धाब्यावर
सीलबंद पाण्याच्या बाटल्या हाताळताना नियमानुसार त्यावर थेट ऊन पडणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असते; पण तालुक्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना बाटल्या दिसाव्या म्हणून त्या उन्हात ठेवलेल्या असतात.
