अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी


प्रतिनिधी::यवतमाळ
प्रविण जोशी


महागांव, ता. ०४ : तालुक्यात असलेल्या दगडथर शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी मंगल रत्ना राठोड गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.०४) दुपारी एक वाजताच्या सुमासार घडली.याबाबत सविस्तर असे की, मंगल रत्ना राठोड यांचे दगडथर शिवारात शेत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शेतात कुटुंबासह काम करतात. दरम्यान शनिवारी (ता.०४) दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतात काम करत असतांना अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात ते गंभिर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पांडु मुडे , आकाश जाधव , रवि जाधव , संतोष आडे हे घटनास्थळाकडे धाव घेत आरडा ओरड केल्याने अस्वलाने तेथुन पळ काढला त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून सध्या सुगीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे मुश्कील झाले आहे.

……चौकट……

वनविभाग मात्र गप्प !

दगडथर या परिसरात या अगोदरही अनेकदा अस्वलाचे शेतकऱ्यांना दर्शन झाले आहेत. यांची माहीती त्यांनी भ्रमनध्वनीवरुन वन विभागाला दिली. यावर उपाययोजना करण्याऐवजी वन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत रोष निर्माण होतांना पहावयास मिळत आहे.

…….चौकट…..

तातडीने अस्वलाचा बंदोबस्त व्हावा !

परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी शेतशिवारांत जाण्याकरीता घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडु मुडे यांनी केली आहे.