होळीची घानमाकड आणि पळसाचा रंग झाला कालबाह्य

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

होळी ग्रामीण भागातील पारंपारिक सण असून या सणाला शिमगा नावानेही ओळखले जाते.यावेळी शेतकऱ्यांची शेतातील कामे आटोपतात. शेतातील पीक घरी आल्याने शेतकऱ्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा येत असल्याने बळीराजा होळी सण उत्साहात साजरा करीत असतो. पण पूर्वीसारख्या होळीला बळीराजा महत्व देत नसून होळी चा रंग बदलत चालला आहे.


आधी ग्रामीण भागात एक महिना आधीच होळीची पूर्वतयारी केली जायची. त्यासाठी जंगलातून, शेतातून लाकडे जमा करणे,घान माकडीची जुळवा जुळव करणे, पळसाच्या फुलाचा नैसर्गिक रंग तयार करणे इत्यादी कामे असायची. परंतु ती परंपरा काळानुसार बदलत चालली असून पळसाच्या फुलांच्या नैसर्गिक रंगाची जागा आता रासायनिक रंगाने घेतली आहे. होळी पेटविण्याची जबाबदारी मुख्यतः गावातील भूमका वर असायची. होळी पटवण्याच्या नियोजित ठिकाणी पंधरा दिवसा आधीच घान माकड लावले जायचे. त्या घाण माकडावर बसून फोद्या (बोंबा) बोंबलल्या जायच्या. घाण माकडीचे लाकडं आणण्यासाठी तरुण मुले ,बच्चे पार्टी स्वतः जंगलात जायचे व स्वतःच घानमाकड तयार करायचे. मधोमध खुंट गाढून त्यावर घाण माकड ठेवून त्या मधोमध चिंचेचे चिंचोके (बिया )ठेवून जेव्हा घाण माकड फिरवायचे तेव्हा त्याच्यातून विशिष्ट असा आवाज यायचा व त्यातून गावातील सर्वाचे मनोरंजन व्हायचे. हा आवाज आता बंद झाल्यागत आहे.


होळीच्या पंधरा दिवसा आधीच बाळ गोपाळ शेणाच्या चकल्या तयार करण्यात व्यस्त असायचे. जवळपास सर्वच घरात शेण चकल्या तयार व्हायच्या. त्या होळीत टाकल्या जायच्या. त्या चकल्याची राख अंगाला लावली जायची त्याने त्वचारोग नाहीसा होतो असा समज ग्रामीण भागात होता. त्यामुळे होळीची राख सर्वच घरात आढळून यायची. लग्नकार्य ही शिमल्यानंतरच करण्याची परंपरा होती. शिमग्याच्या बोंबेंला अशुभ मानले जायचे. होळी सलग दोन दिवस पेटत असायची. होळीच्या निखाऱ्यावर पाणी गरम करून त्यांनी आंघोळ केल्यास रोगराई नष्ट होते असा समाज असायचा.

लाकडाची जागा आता काट्याकुट्याने (गवत, पाला पाचोळा) घेतली आहे. परिणामी ही होळी गवत, काट्याकुट्यांनी पेटवली जाते. घाण माकडीची जागा आता मद्याने(दारू) तर पळसाच्या फुलाच्या नैसर्गिक रंगाची जागा बाजारातील रंगीबेरंगी चायनीज (रसायन युक्त) रंगाने घेतली आहे. शिमग्याची बोंबही दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे उपहासाने बोलली जाणारी “शिमग्याची बोंब दोन दिवस” खऱ्या अर्थाने खरी ठरत आहे.