तेरवीच्या खर्चातून गरजूंना मदत ठेंगे परिवाराचा एक आदर्श सामाजिक संदेश !


प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ


पुसद तालुक्यातील आरेगाव :येथील रहिवासी व श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी वडिलांच्या निधनानंतर तेरवी टाळून गरजूंना मदत देण्या बरोबरच सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधीलकी जपली.
आरेगाव येथील ज्येष्ठ नागरीक, वयाची सत्तर वर्षापर्यंत श्री दत्तप्रभूंची निस्सिम भक्ती करून मानव सेवा करणारे तुकाराम पाटील ठेंगे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले होते.
मृत्यू पश्चात आपल्या पूर्वजांना शांती लाभावी म्हणून तेरवी करण्याची प्रथा आहे परंतु मराठा सेवा संघ श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष व श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.गणेश पाटील ठेंगे व गिरीधर ठेंगे परिवारातील सदस्यांनी कै.तुकाराम पाटील यांनी केलेल्या मानव सेवेचा वसा चालविण्यासाठी तेरवी टाळून गरजूला मदत करण्याचे ठरविले.

त्यानुसार श्रीरामपूरातील एकल पालक तसेच अनाथ बालक व दूर्धर आजारग्रस्त बालकांसाठी सामाजिक दातृत्वातून चालविल्या जाणार्‍या जीवन ज्योती केंद्राचे संचालक राहुल गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आवश्यक असलेले साहित्य देण्याचा मानस व्यक्त केला.

या केंद्रात गायकवाड यांनी सतरा मुलामुलींच्या पालन—पोषणाबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवले आहे. ठेंगे परिवाराने तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून येथील गरजूंना आवश्यक असलेली पाण्याच्या साठवणूकीसाठी एक हजार लिटर पाण्याची टाकी व एक हाॅर्स पाॅवरची मोटारपंप तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘माणूसकीची भींत’या सामाजिक संस्थेस अकरा हजार रुपयांच्या धनादेशाव्दारे देणगी देऊन वडीलांना श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीरामपूर येथील साहित्य वाटप प्रसंगी प्राचार्य डाॅ. गणेश पाटील यांचेसह संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर,सचिव शशिकांत जामगडे,सदस्य गिरीधर ठेंगे, यशवंत देशमुख,ग्रामगिताचार्य गणेश धर्माळे, नाम फाऊंडेशनचे स्वप्निल देशमुख,रोहीत पाटील, जीवन ज्योती संस्थेचे राहुल गायकवाड त्यांचे सहकारी व गरजु मुले—मुली उपस्थित होती. तर कान्हा येथे धनादेश प्रदान प्रसंगी माणूसकीची भिंतचे धनंजय आघम, सोहम नरवाडे, अनंत चतुर यांचेसह प्राचार्य डाॅ.गणेश पाटील, प्रा.चंद्रप्रकाश खेडकर रावसाहेब ठेंगे,अण्णासाहेब ठेंगे, समाधान ठेंगे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.