जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

कर्मचाऱ्याच्या बेमुदत संपाला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचा पाठिंबा.

हिंगणघाट:-२१ मार्च २०२३
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उभारले असून त्याचे पडसाद हिंगणघाट तालुक्यातही उमटले असून आपल्या हक्काच्या ज्वलंत मागणीसाठी तालुक्यातील सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा तहसील कार्यालयासमोर मंडप उभारून बेमुदत संप सुरू केला.
या सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ शहरातून अभूतपूर्व रॅली काढली होती. या संपात सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विविध कर्मचारी संघटना सहभागी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या या न्यायपूर्ण हक्काच्या मागणीला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या मंडपात भेट देऊन आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की रिटायर्ड बापाला पेन्शन नाही, मुलगा शिक्षण घेऊन बेरोजगार आहे, मुलगी उच्च शिक्षण घेत आहे, आई गृहिणी आहे असे असताना कुटुंबाचा गाडा कसा चालू शकतो? याचा सरकारने विचार करायला पाहिजे व जुनी पेन्शन जीवनाशी कसे निगडित आहे हे त्यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
तसेच मंडपातील सर्व कर्मचाऱ्यांशी जुनी पेन्शन या ज्वलंत प्रश्नाविषयी हितगुज करून माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी या संपाला जाहीर
पाठिंबा दर्शविला व जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.