
जिल्हा प्रतिनिधी :प्रविण जोशी
यवतमाळ
महागाव, ता. २४ : शहरातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालाच नसल्याने त्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले असतांना सत्ताधारी व विरोधक ७ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा बडेजाव मिरवीत आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडविण्यात व्यस्त आहेत. मात्र निधी अभावी घरकुलाच्या अपुर्ण कामामुळे लाभार्थ्यांची फरफट होणारी अवहेलना बघुन जनआंदोलन समितीने निधी तत्काळ मिळवुन द्यावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांनाच घेराव घातल्यानंतर निधीच आला नसल्याचे उत्तर त्यांनी दिल्याने सत्ताधारी व विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महागाव शहरातील घरकुल लाभार्थ्यांची संख्या २८५ आहे. गेल्या चार वर्षापासून घरकुलाच्या अनुदानासाठी नगरपंचायत कार्यालय येथे चकरा मारून त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांनी गुरुवारी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात नगरपंचायतचे अधिकारी यांना घेराव घालुन घरकुलाचा
सात कोटी रुपयांचा निधी आणल्याची सत्ताधारी आणि विरोधक पेपर बाजी करत आहेत मग लाभार्थ्यांना निधी का मिळत नाही असा सवाल केला असता . त्यावेळी नगररचना विभागाचे अभियंता राऊत यांनी एक रुपयाही निधी आला नसल्याचे लाभार्थ्यांना सांगून सत्ताधारी व विरोधकांच्या बनावाची पोलखोल केली. यावेळी जगदीश नरवाडे यांनी म्हाडाचे उपसचिव दळवी व उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार नामदेव ससाने यांच्यासोबत मोबाईलद्वारे चर्चा करून लवकरात प्रश्न सोडवा अन्यथा विधान भवन मुंबई येथे लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
….चौकट….
घरकुल बांधकाम करण्याच्या नावावर चार वर्षात कर्जबाजारी झालेल्या लाभार्थ्यांची अवस्था बिकट आहे. राहते घर पाडल्याने काही लाभार्थ्याच्या डोक्यावर छत नसल्याने त्यांची विदारक परिस्थिती बघता शासनाने त्वरित लक्ष देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा लाभार्थ्यासह मंत्रालयावर धडक मोर्चा काढू .
- जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती, महागांव.
