म्हशी घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर वडकी पोलिसांची कारवाई,४० लाखांच्या मुद्देमालासह ३ आरोपी ताब्यात

वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांची उत्तम कामगिरी

सहसंपादक -रामभाऊ भोयर

माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी म्हशींचे बछडे घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेत तब्बल ५० म्हशींच्या बछड्याची सुटका केली. ही कारवाई शनिवार दि २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील बोरी इचोड गावाजवळ करण्यात आली. याप्रकरणी ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती वडकीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी बोरी इचोड गावाजवळ सापळा रचला. दरम्यान नागपूरकडून येणाऱ्या एच.आर ४७ डी.२७३९ या क्रमांकाच्या कंटेनरची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात तब्बल ५० म्हशीचे बछडे आढळून आले. याप्रकरणी इनामुल अकतर (२१) रा अजिजाबाद,सारूक सहीद (२४) रा.अजिजाबाद,सुधाकर कल्याण सुंदरम (३९) रा.खिलामाकुडी
या तीन आरोपींना वडकी पोलिसांनी कंटेनरसह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी ५० म्हशीचे बछडे एकूण किंमत ५ लाख रुपये व कंटेनर ३५ लाख रुपये असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करून सर्व जनावरांना वणी गोरक्षणच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची ही कारवाई कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांच्या मार्गदर्शनात,अरविंद चव्हाण,विकेश धावर्तीवर, निलेश वाढई,विजय बसेशंकर,अविनाश चिकराम,यांनी पार पाडली.