नागपूर ते हैद्राबाद लाइफलाईन असलेला रोड मृत्यूचा सापळा,दुभाजक फोडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथून नॅशनल हायवे क्र ४४ हा गेला आहे.हा रस्ता चार पदरी असल्या कारणाने वाहतुकीस नियंत्रणासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावल्या गेले आहे त्यामुळे दोन्ही कडून या हायवे वरून रात्रंदिवस वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यामुळे वडकी गावापासून देवधरी पर्यंत तर वडकी ते कारेगाव पर्यंत यांच्या सोयीसाठी या नॅशनल हायवे लगत पेट्रोलपंप बार,ढाबे हे थाटले गेले आहे.मात्र या हायवे लगत असलेल्या काही व्यावसायिकांनी नियमाला तिलांजली देत आपल्या सोयीसाठी या हायवे लगतच्या मधात असलेल्या दुभाजकाला फोडून रस्ते तयार केले आहे.अर्ध्यातच दुभाजक फोडून मोठमोठे रस्ते तयार केले आहे.त्यामुळे या हायवे वर मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे.आपल्या सोयीसाठी काही व्यावसायिकांनी दुभाजक फोडून मधातून रस्ते तयार करून अपघाताला आमंत्रण दिल्याचे चित्र वडकी नॅशनल हायवे क्र ४४ वर पहायला मिळत आहे.वडकी ते देवधरी पर्यंत ४ ते ५ ठिकाणी हे दुभाजक फोडून रस्ते तयार केल्या गेले आहे,याच दुभाजक फोडून असलेल्या रस्त्यावर दि १ मे रोजी दहेगाव येथील नयनलाल काळे यांचा हायवे रोडवरील मंगी फाट्याजवळ मोटरसायकलने रस्ता ओलांडताना अपघात होऊन दुर्देवी मृत्यू झाला होता.एवढी मोठी दुर्देवी घटना घडूनही संबंधीत रस्ते विभाग यंत्रणेला जाग आला नाही.वडकी ते देवधरी पर्यंत दुभाजक फोडून मोठ्या प्रमाणात रस्ते तयार केले गेले आहे ही बाब संबंधित यंत्रणेला माहीत असून सुद्धा याला दुजोरा दिल्या जात आहे,यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून हा गंभीर प्रकार थांबवावा अशी मागणी वडकी येथील सूज्ञ नागरिक करीत आहे.