मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती निवड अविरोध,गौरीशंकर खुराणा सभापती व जिवन काळे उपसभापती पदी

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने ३०एप्रिल रोजी मतमोजणी मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला, तर भाजपा-शिंदे गटाला एक जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोण विराजमान होईल यासाठी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष केंद्रित असताना २३मे रोजी झालेल्या बैठकीत सभापतीपदी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा (काँग्रेस) यांची, तर उपसभापतीपदी जिवन काळे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) यांची अविरोध निवड झाली. या निवडीचे सर्वस्तरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मारेगाव विश्रामगृह मध्ये नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये घेतलेल्या निवडणूक बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निनावे यांच्या कडे सभापती व उपसभापती प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली असून सभापती पदी गौरीशंकर खुराणा तर उपसभापती जीवन काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ विजय रामचंद्र देवतळे, श्री गणेश चवले संचालक, माजी नगरसेवक विठ्ठल टाले, पत्रकार सादिक थैम यांनी नवनिर्वाचित सभापती गौरीशंकर खूराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.