गुंज येथे नाल्याच्या पुरात दोन तरुण वाहून गेले,एकाचा मृत्यू, दुसरा बचावला

महागाव तालुक्यातील गुंज येथील दोन तरुण नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून एक जण सुदैवाने बचावला आहे. शिवम रावते (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमोल चव्हाण हा बचावला असून या घटनेने गुंज गावावर शोककळा पसरली आहे. काल मंगळवारी (ता.४ ) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गुंज आणि परिसरात काल मेघ गर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. काही वेळातच छोटे मोठे नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. गुंज बसस्थानकाकडून गावात जाणाऱ्या छोट्या नाल्यालाही पूर आला.
शिवम रावते आणि अमोल चव्हाण हे दोघे मित्र नाल्याच्या पुलावरुन वाहत असलेल्या पुरातून वाट काढत पुढे जात असताना जोरदार प्रवाहाने दोघेही नाल्याच्या पुरात वाहून गेले. अमोल हा काही अंतरावर महत्प्रयासाने बाहेर आला, मात्र शिवम वाहून गेला. गावकर्‍यांनी त्याचा युद्ध पातळीवर शोध घेतला. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव यांनी सर्व पत्रकारांना या दुर्घटनेची लगेच माहिती दिली. दै.सकाळचे प्रतिनिधी विनोद कोपरकर यांनी तहसीलदार संजिवनी मुपडे यांना फोनवरुन घटनेबाबत अवगत केले. उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनाही माहिती देण्यात आली. प्रशासकिय ताफा लगेच घटनास्थळी रवाना झाला. रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी यवतमाळ येथून एनडीआरएफ च्या चमूस पाचारण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबविण्यात आली मात्र शेवटी शुभम रावते या तरुणाचा मृतदेहच हाती लागला. नाल्याच्या पुराचा प्रवाह तीव्र असतो त्यामुळे पुरातून पुढे जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो त्यामुळे सर्वांनी अशा प्रसंगी सावधगीरी बाळगावी व पुरातून मार्ग काढण्याचे साहस करू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे आणि तहसीलदार संजीवनी मुपडे यांनी केले आहे
.