
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे यवतमाळ जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी दिनांक 11/7/2023 रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सभेमध्ये बोलताना शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक विभागाचा कारभार अतिशय भोंगळ असल्याने शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे आपल्या कारभारात वेळेत सुधारणा करा अन्यथा वेतन पथक कार्यालयाला कुलूप लावू असा निर्वाणीचा इशारा दिला.
यावेळी मंचावर प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखास्कर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत ,वेतन पथक अधीक्षक गुंडे, समाज कल्याण अधिकारी ,विस्ताराधिकारी पप्पू पाटील भोयर, विस्ताराधिकारी शेंडगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
वेतन पथक विभागातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जीपीएफ च्या पावत्या वेळेवर दिल्या जात नाहीत मासिक पगार देखील अनियमितपणे केला जातो निवृत्तीवेतनधारकांचे पगार विलंबाने दिली जातात या सर्व प्रकारामुळे विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा सर्वाधिक मागासला असून त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एक महिन्यानंतर सभा आयोजित करून सुधारणा झाली किंवा नाही याचा आढावा मी स्वतः घेईल असे यावेळी आमदार अडबाले म्हणाले.
सातवा वेतन आयोगाचा फक्त पहिला हप्ता सर्व शिक्षकांच्या खात्यात जमा झाला असून दुसरा,तिसरा आणि चौथा कधी करणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला एम पी एस धारकांना आतापर्यंत किती हप्ते जमा केले याची माहिती देखील शिक्षण विभाग व वेतन विभागाकडून व्यवस्थित देण्यात आली नाही त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एक नंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शन व अनुकंपा तत्त्वावर नोकरी किती लोकांना दिली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कारभारावर अडबाले यांनी ताशेरे ओढले. शिक्षक भरती मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये मानधनावर पुन्हा परत शिकवण्यासाठी बोलवणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची चेष्टा करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. अनुदानित 20, टक्के 40, टक्के 60 टक्के80 टक्के यावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफचे पैसे मिळाली नसतील त्या कर्मचाऱ्यांनी लोकायुक्ताकडे तक्रार करावी व संबंधित कर्मचाऱ्यांकडून रकमेवर 15 टक्के व्याज वसूल करावे अशी सूचना निवृत्तीधारकांना त्यांनी केली तसेच माध्यमिक विभागामध्ये अप्रूवलवर जावक क्रमांक न टाकणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करा अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अशफाक खान जिल्हा कार्यवाहक रामकृष्ण जीवतोडे व सर्व जिल्हा कार्यकारिणीने मेहनत घेतली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
