जल जीवन मिशनच्या जलकुंभाचा स्लॅब कोसळला, पाच कामगार गंभीर जखमी

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

महागाव तालुक्यात जल जीवन ची कामे प्रचंड बोगस

पोखरी येथे बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या जल जीवन मिशन च्या जलकुंभाचा स्लॅब कोसळला. या घटनेत किमान पाच कामगार जखमी झाले असून दोघांचे पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.आज रविवारी दुपारी ४ वाजता ही दुर्घटना घडली. महागाव तालुक्यात जल जीवन मिशन च्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून आजची दुर्घटना याच भ्रष्टाचाराचा परिपाक असल्याचे मानले जात आहे. पोखरी (बाबासाहेब नगर ) येथे ग्रामपंचायत अंतर्गत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीचे (जलकुंभ) काम करण्यात येत आहे. यवतमाळ येथील कंत्राटदाराकडे या बांधकामाचा ठेका असल्याचे कळते. लाकडी सेंट्रींग लावून जलकुंभाचा स्लॅब टाकण्यासाठी आज सकाळपासूनच घाई गडबडीत काम उरकण्यात येत होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास या निकृष्ट कामाची तकलादू सेंट्रिंग तुटली आणि सिमेंटचा कच्चा स्लॅब कोसळला. या वेळी बांधकामावर चार ते पाच कामकार वर काम करीत होते. स्लॅब सोबत हे मजूर खाली कोसळून गंभीर जखमी झाले. यातील दोघांचे पाय गंभीररित्या फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कामगार दिग्रस येथील रहिवाशी आहेत अशी माहिती पोखरी येथील नागरिकांनी दिली. पाण्याच्या टाकीचा स्लॅप कोसळल्यानंतर या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना स्थानिक नागरिकांनी मलब्या खालून बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात हलविले.