फूलसावंगी येथे सर्प मित्राने दिले अकरा फुटाच्या अजगराच्या जीवनदान

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

भक्ष्याच्या शोधात ऊमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य लागून असलेल्या नारळी गावा जवळ आलेल्या अकरा फुटी अजगराला फुलसावंगी येथील सर्पमित्र सचीन कोकने आणि त्यांचे सहकारी राम बहादूरे, आकाश कांबळे, ओम काटोले, यांनी सुखरुप पकडून अभयारण्य परिसरात सोडून देत जीवनदान दिले आहे.
१९ ऑक्टोबर रोजी नारळी येथील एका शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकामधे भला मोठा अजगर असल्याची माहिती सर्पमित्र सचीन कोकने याला मिळाली होती. माहिती मिळताच सचीन कोकने यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत नारळी गाव गाठले. अजगर जरी वरवर सुस्त असल्याचे भासवत असला तरी तो कधी हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने सचीन ने सहकार्‍यांना योग्य त्या सूचना केल्या होत्या.
कृत्रिम प्रकाशात रेस्क्युअर्स त्या अजगराला सुरक्षित पकडण्यास सज्ज झाले. पूर्वानुभव असलेल्या सचीन ला हे ऑपरेशन कठीण वाटत होते; कारण हा अजगर मोठा आणि वजनदार देखील होता. त्यामुळे प्रचंड ताकद लावून अजगर पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सचीन ची दमछाक होत होती.
अखेर सहकार्‍यांच्या मदतीने या अजगराला दुखापत न करता पकडले. अजगराची लांबी मोजली असता जवळपास अकरा फूट लांब असल्याचे सचीन कोकने यांनी सांगितले. नारळी परिसरात एवढ्या मोठ्या लांबीचा अजगर सापडल्यानंतर अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान, या अजगराला तालुका वनविभागाच्या निर्देशानुसार सुरक्षित वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले.