ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नावर समाजमन संतप्त,महागाव तालुका पत्रकार महासंघाचा उपोषणाचा इशारा

महागाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत मागील पाच वर्षापासून उदघाटनाची वाट पाहत आहे. साडेचार कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च करून बांधलेल्या ग्रामीण रुग्णाल्याच्या इमारतीचा हा पांढरा हत्ती असाच किती काळ पोसायचा असा प्रश्न महागाव तालुक्यातील संतप्त जनता विचारत आहे. विकासाच्या पांचट गप्पा करण्यात वेळ घालवण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी आमचे ग्रामीण रुग्णालय तेवढे सुरू करावे अशी कळकळीची हाक महागाव तालुक्यातील हजारो रुग्ण देत आहेत. महागाव मुख्यालयाला तालुक्याचा दर्जा मिळून आता ४२ वर्ष उलटली आहेत,मात्र महागाव शहर व आजुबाच्या ३० खेडेगावांच्या आरोग्याचा बोजा कालबाह्य झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आहे. कै.विठ्ठलराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे ६ कि.मी. अंतरावरील सवना येथे अर्ध शतकापूर्वीच ग्रामीण रुग्णालय झाले मात्र, तालुका मुख्यालय असलेल्या महागावची ससेहोलपट संपायचे नाव घेत नाही. महागाव येथील ग्रामीण रुग्णालयाला हिरवी झेंडी मिळाली आणि साडेचार कोटीचा निधीही मंजूर झाला.२० जुलै २०१८ रोजी इमारतीच्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला. सुसज्ज अशी टुमदार इमारत उभी राहिली मात्र अत्यंत तकलादू कारणांमुळे ग्रामीण रुग्णालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प थंड बस्त्यात पडला आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग या दोन डिपार्टमेंटमधील सवतसुभा सध्या गोर गरीब रुग्णांच्या मुळावर उठला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामात किमान ३० त्रुट्या काढल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय इमारतीचे हस्तांतरण करून घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या आधीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या नकाशानुसार इस्टिमेट करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. लेबर रूम चे पार्टीशन, ओटे, वेटींग एरियातील फर्निचर, कॉरीडोर मधील दरवाजांना काचा, या सारख्या कामात जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्रुटी काढल्या. या कमतरतांसह इमारत हस्तांतरीत करून घेतली तर कंत्राटदार पुन्हा कोणतीही डागडुजी करायला इकडे फिरकत नाही. त्यामुळे सुविधांच्या उणिवा असलेली इमारत ताब्यात घेता येणार नाही अशी त्यांची भुमीका होती. बांधकाम उपविभागाने मात्र आपले वेगळेच रडगाणे सुरू ठेवले आहे. प्रत्येक सिव्हिल सर्जनच्या सुचना ऐकल्या तर या जन्मात ही इमारत हस्तांतरित होणार नाही अशी कोटी ते करीत आहेत. या दोन विभागांच्या श्रेय वादात महागावच्या जनतेचे आरोग्य टांगणीला लागले आहे.

…………………………………………..

आमदाराकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत

आ. नामदेवराव ससाने यांचे महागाव तालुक्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. मागे त्यांनी उमरखेड तालुक्यात साडेतीन कोटींची विकास कामे प्रस्तावित केली, यात महागावच्या कपाळी १ रुपयाची टिकलीही लावली नाही. महागाव ग्रामीण रुग्णालयाची समस्या त्यांना माहितही नाही. जिल्हा शल्य चिकित्सक आणि बांधकाम उपविभाग महागाव यांच्यातील दरी मिटवून ग्रामीण रुग्णालयाचा शुभारंभ कसा करता येईल यासाठी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी पद मंजुरीचा प्रस्ताव मुंबईकडे गेला काय? गेला असेल तर पदस्थापणा करण्यासाठी आमदारांनी जोर लावला पाहिजे. शल्य चिकित्सकांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा करतो म्हटले तर यासाठी जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव ठेवून स्वतंत्र निधी मंजूर करावा लागणार आहे. यात वेळेचा मोठा अपव्यय होणार आहे. पद मंजुरी आणि नवीन आस्थापना कार्यान्वित करून तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरु करणे काळाची गरज आहे. आ. नामदेवराव ससाने यांना यासाठी ताकतीने प्रयत्न करावे लागतील. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर इंफास्ट्रक्चर दुरुस्तीची अनुषंगिक कामे नंतरही करता येतील.
………………………………………………

ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास होणारे सकारात्मक फायदे

महागाव शहराच्या मुख्यालय ३० खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. या रुग्णालयाचा कारभार सुरू होताच १ वैद्यकीय अधीक्षक, ३ तज्ञ वैद्यकीय अधिकारी, ८ परिचारिका, ८ परिचारक व अन्य स्टाफ आरोग्यसेवेसाठी येथे दाखल होईल. सुसज्ज प्रसुती विभाग, एक्स-रे, माता बाल संगोपन केंद्र, अतिगंभीर रुग्णांवर उपचार, सर्पदंश, अपघात व अन्य इमर्जन्सी रुग्णांसाठी मुख्यालयी २४ तास सेवा उपलब्ध होईल. एमएलसी किंवा शवविच्छेदनासाठी सवना येथे जाण्याचा त्रास वाचेल. शहरात प्रसूतीची सुविधा नसल्यामुळे आजही गरोदर मातांना सवना किंवा पुसद येथे न्यावे लागते. ग्रामीण रुग्णालय यामुळे ही सुविधा सुद्धा महागाव येथे उपलब्ध होईल. कोरोना आणि त्यानंतर व्हायरल फ्लू मुळे गोरगरीब जनता हवालदिल झाली आहे. आता डेंग्यूने तालुक्यात ५ रुग्ण दगावले असून,डेंग्यू , मलेरिया, टायफाईड आणि व्हायरल फिव्हर मुळे खासगी दवाखान्यात रुग्ण मावेनासे झाल्याचे विदारक चित्र आहे. या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.कोरोना काळात लॉक डाऊन मुळे आधीच जनता मेटाकुटीस आली, त्यात वेगवेगळे आजार डोके वर काढत असल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. आ.नामदेवराव ससाने यांनी चार वर्षात महागाव तालुक्यासाठी ठोस काम केलेले नाही. ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडविला तर त्यांच्यासाठी ही चांगली उपलब्धी ठरणार आहे. ठाकरे सरकार गडगडल्यानंतर आता शिंदे गटासोबत भाजपाने सत्तेचे सूत्र हाती घेतले आहे. सत्ताधारी आमदार म्हणून नामदेवराव ससाने यांनी महागावच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवावा अशी माफक अपेक्षा आहे.


पत्रकार महासंघ करणार आमरण उपोषण

महागाव येथील ग्रामीण रुग्णालय सुरु व्हावे यासाठी पत्रकारांनी सातत्याने वृत्त प्रकाशित करुन शासनाचे व लोकप्रतिनिधींचे या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार, खासदार आणि शासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न तसाच धूळखात पडला आहे. १९ नोव्हेंबर पर्यंत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले नाही तर महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश पाटील भोयर, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष मोहन पांढरे, सचिव अमोल राजवाडे, सहसचिव नरेंद्र नप्ते, सरचिटणिस शेख तस्लीम, कोषाध्यक्ष मंचक गोरे, शहराध्यक्ष संजय कोपरकर, उपशहराध्यक्ष पवन रावते यांच्यासह पत्रकार महासंघाचे सर्व ६० पत्रकार सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहेत.