ऐकावं ते नवलच ! सवंगणी उपरांत होणार सोयाबीन नुकसानीचा पंचनामा
( मंत्रीमंडळाच्या निर्णयाला दिरंगाई ची वाळवी, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? शेतकऱ्यांचा सवाल)

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

पिवळा मोझाक ‘ व ‘चार्फुल रॉट’ च्या प्रादुर्भावाने यंदा राज्यातील ३६ हजार हेक्टर सोयाबीन पीक बाधित झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेल्याचे दुःख सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या भोगतो आहे. तालुक्यातील राळेगाव,वडकी, सावरखेडा, मोहदा या पट्यात एकरी २ क्विंटल सोयाबीन हाती लागले. कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. त्यावर गतिमान (?)शासनाने पंचनामे करण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन सवंगणी संपन्याच्या मार्गांवर असतांना आता पंचनाने होणार कसे व पंचनामेच होणार नाही तर मदत मिळणार कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत तातडीने पंचनामे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथे दिली. पण सोयाबीन शेत खाली झाल्यावर पंचनामे कशाचे करणार याचे उत्तर त्यांनी दिले नाही. विरोधी पक्षाने ताकतीने हा मुद्दा उपस्थित केला नाही.
उच्च दर्जाच्या निर्बूद्ध|चे वराती मागून घोडे दामटणे हा अनुभव शासकीय कामकाजा बाबत सर्वसामान्यांना नवा नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन हा मार्ग निवडन्यातुन तॊ आधीही अधोरेखित झाला आहेच.समुपदेशकांची पदेच रिक्त असली तरी त्याची पर्वा करण्याची गरज शासनाला वाटतं नाही.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही अश्याच तुघलकी निर्णय व दिरंगाई चा फटका या मुळे बसण्याची शक्यता आहे. पंचनामे केल्या खेरीज आर्थिक मदतीचा मार्ग प्रशस्त होत नाही हा आजपर्यंत चा अनुभव आहे. राळेगाव तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले.११ गावे पाण्याखाली गेली तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला. त्या वेळचे विरोधीपक्ष नेते व विध्यमान अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील राळेगाव तालुक्यात भेट देऊन स्थिती चा आढावा घेतला होता, त्या वेळी विरोधीपक्षनेत्यांनी तत्काळ पंचनामे करा अशी मागणी केली होती तर कृषी मंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्याच्या वल्गना केल्या होत्या. पंचनाम्या शिवाय मदत देऊ शकत नाही असा कंठशोष या मंत्र्यांनी केला होता. आज सोयाबीन उत्पादक संकटात आहे जर खरोखर त्याला मदत करायची असेल तर पंचनामे आधी का करण्यात आले नाही हा प्रश्न या पार्शभूमीवर समोर येतो.
दिवाळी सणं तोंडावर आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकात नांगर फिरवला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. या बाबत गेल्या महिनाभरापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पीक खराब झाल्याची ओरड करीत होता .कृषी विभागाकडे असंख्य तक्रारी आल्या. या बाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. मात्र त्यावर तातडीने निर्णय घेण्यात आला नाही. सोयाबीन संवगणी अंतिम टप्यात असतांना राज्य शासनाला जाग आली.मंत्रीमंडळाच्या बैठकीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कृषी मंत्री धनंजय मुंडे कुठे आहेत त्यांचे त्यांना माहित मात्र शेतात सोयाबीन नसतांना पंचनामे करणार कसे आणि मदत देणार कशी हा पेच निर्माण झाला आहे. सरकारी कामं व सहा महिने थांब हा अनुभव गृहीत धरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी सोयाबीन शेतातच सडु देणे अपेक्षित होते काय असा संताप व्यक्त होतोय.


प्रतिक्रिया


एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन उतारी यंदा आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाचा खंड पडला, त्या नंतर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. सोयाबीन उत्पादक शेतकरी आज हवालदिल झाला आहे. त्यातच सोयाबीनला अत्यल्प दर मिळत असल्याने सर्व बाजूनीं शेतकऱ्यांची कोंडी झाली. शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
देवीदास भाऊ ठाकरे पाटील येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ