दिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर मजुरांचे स्थलांतर

मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका; भगीरथ लोकप्रतिनिधी उदयास येईल का?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

   

तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या नगदी पिकांवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूरांना दिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. आर्णी , दिग्रस, दारवा उमरखेड, महागाव, पुसद व इतरही तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी पुणे, मुंबई या महानगरात तर काही मजूरवर्ग पश्चिम महाराष्ट्रात व विदर्भातऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होतात. आपल्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून काही खेडेगावातील लोक आता दिवाळीच्या तोंडावर घराला कुलूप लावून बिराड डोक्यावर घेऊन ऊसतोडीसाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या बाबीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला सर्व लोक घरी येतात. मात्र तालुक्यातील जनतेला कामाच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा भगीरथ उदयास येईल का, असा सवाल निर्माण होत आहे.

तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर दरवर्षी स्थलांतरित होतात. अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागते. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. या तालुक्यांची ओळख आता ऊसतोड कामगारांसाठी स्थलांतरित म्हणून होत चालली आहे. अनेक जिल्ह्यात तालुक्यातील मजूर आपल्या मुलाबाळासह ऊसतोडणीच्या कामावर निघून जातात. दिवाळीच्या आधीच अनेक कुटुंब ऊसतोडणीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटक येथे जातात. आपल्यानंतर आपल्या मुलाबाळाची काय म्हणून हे मंडळी आपल्या सोबत शिकत असलेल्या लहान मुलांना देखील घेऊन जातात. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात व पुढे ते देखील हेच काम करतात. या गंभीर बाबीकडे प्रशासन यंत्रणा लक्ष वेधतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी फारसे लक्ष देत नसल्याचा आरोपही यानिमित्ताने होत आहे. जर शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सुविधा असती तर या कुटुंबावर आपल्या चिमुकल्यासह स्थलांतरित होण्याची वेळ आली नसती. मात्र वास्तव फार भयान असल्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.