
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर व प्रमुख पाहुणे म्हणून शि. प्र. म. विद्यान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी, रसायन शास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक व्ही. एस. जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्नील गोरे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा. डॉ. व्ही. एस. जगताप यांनी आपल्या भाषणातून संत गाडगेबाबांचे चरित्र व कार्य विशद केले तर प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गाडगे बाबा यांनी दिलेल्या दशसूत्रीचे आजच्या घडीला असलेले महत्त्व पटवून विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. अभिवादन सभेनंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर लख्ख करून स्वच्छतेच्या माध्यमातून अभिवादन केले. या स्वच्छता अभियानामध्ये रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. भाग्यश्री कृ. लोहकर, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अमोल लिहितकर यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कीर्ती राऊत हिने तर आभार प्रदर्शन कु. मानसी भोयर हिने केले.
