पिण्याच्या पाण्याची समस्या शहरातील हातपंप मोजतात अखेरच्या घटका


प्रतिनिधी : प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी शहरासाठी पाणी समस्या काही नवीन नाही व हा क्षणात मिटणारा प्रश्न नाही हे सर्वसामान्य सुद्धा जाणून आहेत काही दिवसापूर्वी आमडापूर येथील लघु सिंचन प्रकल्पावरून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन द्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याचे प्रयोजन होते व त्यासाठी मोजमाप व इतर तांत्रिक बाबी आणि खर्चाची तजवीसाठी सर्वे सुद्धा झाला सर्वसामान्य जनतेत चर्चा होती . मात्र त्या योजनेला कोणत्या अदृश्य शक्तीची नजर लागली हे शहरवासीयांना कळायला मार्ग नाही एकूणच काय लोकप्रतिनिधी हे गांधारीची भूमिका बजावताना दिसत आहेत आणि मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी. तसं बघता हा प्रश्न एकाएकी मिटणार नाही हे शहरवासी नक्की जाणून आहेत ग्रामपंचायत चे रुपांतर नगरपंचायत मध्ये झाले तरी शहरांमध्ये पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ही किमान अंदाजे ३० वर्षांपूर्वीची आहे तेव्हा अशा जुन्या झालेल्या यंत्रणेवर शहराचा गाडा कसा हाकल्या जाईल त्यात कुठं सुधारीत पण येताना दिसतो आहे.

ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यावेळी अनेक प्रभागांमध्ये हातपंपाची व्यवस्था केली गेली पण ती आताच्या क्षणी कुठे बंद अवस्थेत तर कुठे नादुरुस्त अवस्थेमध्ये हात पंप दिसतात. हातपंपाचे वैशिष्ट्य असे की आपल्याला ज्यावेळी आणि जितके पाणी पाहिजे तितकेच मिळू शकते तसेच विद्युत प्रवाह नसताना सुद्धा सुयोग्य प्रकारे असंख्य शहरवासीयांची गरज हे हात पंप पूर्ण करू शकतात ज्या प्रभागांमध्ये हात पंप आहेत त्या प्रभागातील ही अडचण सोडविल्यास थोड्याफार प्रमाणात लोकांची होणारी हेळसांड थांबेल पण प्रभागातील या समस्येकडे टिनपाठ लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष येणाऱ्या काळात अधिकच होईल त्यावेळी हे हातपंप कामधेनु प्रमाणे काम करतील व ज्या त्या प्रभागातील जनतेची तृष्णा तृप्ती करेल एवढे नक्की तसे बघता तसे शहरातील नळ हे पंधरा दिवसाला येत असून सर्वसामान्य रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबाकडे १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करायला उपलब्ध साधनसामग्री असायला पाहिजे पण मध्यमवर्गीय कुटुंबाकडे कशी असणार त्यामुळे रोजमजुरी करणाऱ्या असंख्य कुटुंबाची अडचण सुद्धा होत आहे. तसेच लोकप्रतिनिधी हातपंप दुरुस्ती करणाऱ्यांकडून ते व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. मोहमायेची अपेक्षा न ठेवता असे झाल्यास उत्तमच अन्यथा त्यांच्या मागे भीती स्वरूपातील बागुलबुवा दाखवल्यास त्याच्या सुद्धा मनोबलाचे खच्चीकरण होईल आणि होणारे काम सुद्धा योग्य होणार नाही. त्यांना दर्जेदार स्वरूपातील हातपंप दुरुस्तीचे साहित्य पुरवल्यास काही प्रमाणात पाणी समस्येपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. लोकप्रतिनिधीनी झारीतील शुक्राचार्य प्रमाणे भूमिका बजाऊ नये म्हणजे झालं तसेच ज्या वेळी नगरपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेस अनेक मातब्बर तालुक्याच्या लोकनेत्यांनी आश्वासित केली होते की ढाणकी शहराची पाणी समस्या मिटवू व निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना अक्षरशा:: जुन्या बसस्थानक परिसरात त्याचा जयजय कार झाला पण तो तत्कालीन फौज फाटा गेला कुठे ??