सततच्या पावसामुळे पिके पडली पिवळी,तणही वाढले; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगांव तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश शिवारातील पिके पिवळी पडून सडू लागली आहेत. तसेच पिकांपेक्षा तण अधिक वाढल्याने शेतकरी चिंतित आहे.

यंदा तालुक्यात जवळपास ५९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. जून महिन्यापासून अधूनमधून पडणाऱ्या शेतीपूरक पावसाने पिके तरारली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पिकांची वाढ समाधानकारक होती. परंतु, गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने खरिपाची बहुतांश पिके पिवळी पडू लागली आहेत. तर दुसरीकडे तणनाशक फवारूनही पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.संततधारेमुळे जमिनीला वापसा होत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची अंतर्गत मशागतीची कामे रखडली आहेत. काही भागात जमिनीला वापसा नसल्याने शेतकरी खुरपणी, कोळपणी करूशकले नाहीत. तसेच सोयाबीन पिकावर विविध कीड, अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यापुढे काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास खरीप हंगाम धोक्यात येतो की काय, अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सतत – पावसाची रिपरिप चालू असल्यामुळे – शेतीतील कामे पूर्णपणे खोळंबली – असून, पाऊस कधी विश्रांती घेतो, – याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

बाजारपेठेवरही परिणाम

आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम राळेगांव शहरातील बाजारपेठेवरही झाला आहे.

शहरातील हॉटेल, कापड यासह अनेक व्यापाऱ्यांना ग्राहक नसल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

काही व्यावसायिक तर पावसामुळे दुकानेही उघडत नसल्याचे चित्र आहे.