
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरात आमदार होऊ इच्छुकांनी धुमाकूळ घातला. सेवानिवृत्त अधिकारी ऍक्टिव्ह झाले. कुणी पॉम्पलेट छापले,कुणी बॅनर लावले कुणी, जनतेचा कैवार घेऊन बैठकांचा सपाटा लावला.विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळत असल्याने या भेटीना महत्व आले आहे. आमदार इच्छुकांच्या गडबडीची.’ आमदार व्हायचं ज्याला, राळेगाव विधानसभा मतदार संघाकडे चला ‘ अशी स्थिती सध्या राळेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आहे. या मुळे नाही म्हटले तरी विध्यमान आमदार प्रा. डॉ. अशोक उईके व माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांचे टेंशन वाढल्याची मतदार संघात चर्चा आहे.
नागपूर चे एक माजी सनदी अधिकारी गेल्या दोन वर्षा पासुन कमालीचे ऍक्टिव्ह होते.आता ते उमेदवारी करीता मुंबईला ठाण मांडून बसल्याची चर्चा ऐकू येते.आता ते दिसतं नसले तरी राळेगाव विधानसभा मतदार संघात मीच आमदार म्हणून त्यांनी हवा तयार केली. या आमदारकी साठी इच्छुकांचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काही जण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष|च्या मागे हे इच्छुक फिरत असल्याची माहिती सांगतात तर काही जण आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांची महायुती कडून व प्रा. वसंत पुरके यांची महाविकास आघाडी कडून उमेदवारी कायम राहणार असे छातीठोकपणे सांगताना दिसतात. मतदार संघात वणी, झरी जामणी येथे काँग्रेस च्या माजी जिल्हाध्यक्ष छत्रछायेत जाऊन आमदार होण्याची स्वप्न पाहणारे हे भिडू नंतर च्या काळात राळेगाव विधानसभा मतदार संघाकडे वळले. जि. प. निवडणुकीत पराभव झाल्याने तिकडे विधानसभा मतदार संघात आपली डाळ शिजणार नाही याची पुरती कल्पना त्यांना आली आणि राळेगाव च्या राजकीय वर्तुळात त्यांनी एन्ट्री घेतली. काँग्रेस मधील गटबाजीचा अचूक वापर करून आपली पोळी शिजवन्याचा प्रयत्न करून पाहिला. भाऊ च्या कार्यकर्त्यांशी जवळीक साधली मात्र काँग्रेस ची उमेदवारी काही पदरी पडली नाही. प्रा. वसंत पुरके यांना डावलून यांना पक्ष तिकीट मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर दिसते. दुसरीकडे एक दुसरे माजी सनदी अधिकारी देखील दोन्ही डगरी वर पाय ठेऊन उभे आहेत. त्यांनी पॉम्पलेट छापून प्रतिमा संवर्धनाची खेळी केली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अशा अनेकांना निवडणुका जवळ आल्या आणि राळेगाव विधानसभा मतदार संघाची आठवण झाली. दोन्ही माजी मंत्र्यांना डावलून आपला खुटा बळकट करण्याचा प्रयत्न सुरु केला. मतदार संघात काही जणांना हाताशी धरून मलाच उमेदवारी मिळणार असे वातावरण निर्माण तयार करण्याची कवायद चर्चेचा विषय ठरली. काही जन तर लोक पैसे मागतात असा मतदारांचा अपमान करणारी भाषा यांच्या तोंडी असल्याची माहिती त्यांच्याच जवळचे लोक देऊ लागले आहे. एका नेत्यांला पकडायचे त्यांना सोडून दुसऱ्याला धरायचे मग तिसऱ्याच्या कडे धावायचे त्यानंतर आधीच्या तिघांचीही बदनामी करून राज्याच्या बड्या नेत्यांना गाठायचे या कोलांटउड्या जनतेचे मनोरंजन करतात मात्र गँभीरतेने यांना कुणी घेत नाही या वास्तव्याकडे यांचे लक्ष नाही.
अनु. जाती करीता राखीव मतदार संघ हा बड्या पैसे वाल्या करीता नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. त्यातही राळेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आले व स्वपक्षाच्या सत्तेचे जुगाड जमले की थेट मंत्री पदावर वर्णी लागते असा लौकिक या मतदार संघाचा असल्याने माया जमवलेल्याना इथे येण्याची इच्छा होते. मात्र सामाजिक पातळीवर कोणतेही ठोस कामं न करता बॅनरबाजी व शेतकरी, कष्टकरी माणसाच्या प्रश्न|बाबतचा खोटा आव कशासाठी आहे हे लपून राहात नाही. इथल्या सर्वसामान्य माणसाप्रती पुतनामावशीचे हे दिखावूप्रेम यांना आमदारकी पर्यंत घेऊन जाणार हा भाबडाआशावाद पूर्णत्वास जाण्याची मात्र चिन्ह नाहीत.
बॉक्स 👇
दोन्ही सरांना काँग्रेस, भाजपा उमेदवारी देणारच नाही, भाऊंची मला गरजच नाही मी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या जवळ आहे.अशी फुशारकी मारून निवडणुका जिंकायची स्वप्न केवळ नौटंकी च्या भरोशावर पाहणे हे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. चार दोन ठिकाणी भेटी देणे, कार्यक्रमाची वर्गणी देणे. प्रचंड फोटोसेशन करने.एखादया गावात तुटपुंजी मदत करून मतदार संघातील चारशे गावापर्यंत मी पोहचलो अशी शेखी मिरवणे याने निवडणुका जिंकता येत नाही. सर्वसामान्य माणसाच्या समस्या बिकट बनल्या आहे. त्या बाबत कोणताही ठोस कार्यक्रम नसणारे हे उमेदवार पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्यागत असल्याची एका जाणकार नेत्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.
