
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे ३ दुकाने फोडून दुकानातील नगदी रोख सह मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार रविवारी सकाळी दुकान मालकाच्या निदर्शनात आला. दरम्यान दोन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
वडकी येथे दुकानांचे शटर वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करीत रोख रकमेसह ऐवज लांबविला. यात जगदीश पारखी यांच्या मालकीचे संत भोजाजी किराणा,महेश देऊळकर यांचे सती सोनामाता किराणा व किशोर कारिया यांचे साई कृषी केंद्र अश्या तीन दुकानांचा समावेश आहे.
चोरट्यांनी मध्यरात्री २ च्या दरम्यान तिन्ही दुकाने फोडली.
यामध्ये जगदीश पारखी यांच्या संत भोजाजी किराणा या दुकानाच्या शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी दुकानातील 35 ते 40 हजार रुपयांचे चिल्लर नान्हे लंपास केला.तसेच राळेगाव रोडवर असलेल्या किशोर कारिया यांच्या साई कृषी केंद्र या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातील एक 30 हजार किंमतीचा मोबाईल व नगदी ६ हजार रुपये चोरून नेले.सोबतच महेश देऊळकर यांच्या सती सोनामाता किराणा या दुकानाचे सुद्धा शटर खोलून दुकानातील 5 हजार रुपयांचे चिल्लर नान्हे चोरून नेले.
घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,पोलीस कर्मचारी आकाश कुदुसे, अंकुश पाथोडे,निलेश वाढाई यांनी घटनास्थळी देऊन सीसीटीव्हीची पाहणी करून माहिती घेतली असून अधिक तपास वडकी पोलीस करीत आहे.
