
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथे बेंबळा पाटबंधारे विभाग यवतमाळ व ज्ञानसाधना शिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्था बळकटीकरण 25_26_27 अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास पाणी वापर संस्थेचे लाभार्थी शेतकरी, महिला व संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात पाणी वापर संस्था सक्षम करण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर, अध्यक्ष व सचिवांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या तसेच संस्थेच्या सुयोग्य व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पाणी वापर संस्थेचे महत्व , कार्य पद्धती तसेच लाभधारक सदस्यांना उद्भवणाऱ्या समस्या वर सखोल मार्गदर्शन केले पाणी वापर संस्था हि केवळ पाण्याचे नियोजन करणारी संस्था नसून शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवणारी प्रभावी यंत्रणा असल्याचे सांगितले संस्थाचे अध्यक्ष , सचिव व सदस्य यांची जबाबदारी काय असते संस्था गाव पातळीवर कशा प्रमाणे प्रभावीपणे काम करू शकते व शेतार्यांच्या तक्रारी संबधित तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिला बचत गटाच्या योजना, वृद्धासाठीच्या योजना विद्यार्थ्यासाठीच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना या योजनाविषयी उपस्थिताना सविस्तर आशा प्रकारचे मार्गदर्शन प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी केले.
त्यानंतर ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत यांनी पाणी वापर संस्थांच्या भविष्यातील जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले. भविष्यात पाणी वापर संस्थांचे हस्तांतरण झाल्यानंतर संपूर्ण कामकाज संस्थेलाच करावे लागणार असल्याने संचालक मंडळाने कायद्याचे ज्ञान, आर्थिक शिस्त आणि संघटनात्मक क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कर आकारणी व वसुली संदर्भात त्यांनी महाराष्ट्र सिंचन व्यवस्थापन कायद्यातील कलम 27(1) नुसार कर आकारणी व कलम 27(4) नुसार वसुली करण्याबाबत माहिती दिली. वसूल झालेली रक्कम बेंबळा पाटबंधारे विभागाकडे जमा करून त्यातील ५० टक्के परतावा संस्थेला प्राप्त करून घ्यावा व त्या निधीतून , लघुवीतरीका आणि इतर देखभाल-दुरुस्तीची कामे करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कृषी तज्ञ प्रदिप भगत यांनी त्यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण ही भविष्यासाठी चिंतेची बाब असल्याचे सांगितले. पूर्वी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुमारे ५ टक्क्यांपर्यंत होते; मात्र रासायनिक खतांच्या अति वापरामुळे ते अत्यंत कमी पातळीवर आला आहे. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावे लागणार असे त्यांनी सांगितले.
सहप्रशिक्षक प्रणय डोंगरे यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांवर भाष्य केले. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पीक लागवड न करता परिस्थितीनुसार नियोजन करावे, खर्चिक बियाणे व अवाजवी गुंतवणूक टाळावी तसेच उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून पीक नियोजन करावे, त्यांनी पिक पद्धती मध्ये बदल करणे पारंपारिक कपाशी व तूर पिका एवजी हळद, मिरची, शेवगा लागवड, फळबाग लागवड , कमी पाण्याची पिके घेणे आदि पिकाचे लागवड ते काढणी पर्यंत चे पूर्ण मार्गदर्शन केले त्यानंतर त्याची साठवण व विक्री व्यवस्था तसेच प्रक्रिया उद्योग कशे गाव पातळीवर तयार करता येईल त्याचे पूर्ण ज्ञान शेतकऱ्यांना कसे प्राप्त होईल ह्याचे सविस्तर मार्गदर्शन सह प्रशिक्षक प्रणय डोंगरे यांनी केले आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ज्ञानसाधना शिक्षण संस्था हि कटिबद्ध असल्याचे प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी उपस्थिताना आश्वस्त केले
ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रियंका पाटील व सचिव मनीष भानवे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रशिक्षण होत आहेत पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञाना मार्फत शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यामार्फत गावात काम उभे कसे होईल हा उद्देश संस्थेचा आहे
या कार्यक्रमास ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत, कृषी तज्ञ प्रदिप भगत, मुख्य प्रशिक्षक भाग्यश्री पाटील, सहप्रशिक्षक प्रणय डोंगरे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष रामभाऊजी उल्लेवार, सचिव शंकरराव पराते, माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव नलिनीताई पराते, भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष वर्षाताई उल्लेवार ,शततारका पूनवटकर तसेच लाभक्षेत्रातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणाचे सूत्र संचालन सचिव शंकरराव पराते यांनी तर आभार प्रदर्शन शततारका पूनवटकर यांनी केले.
