
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रावेरी येथे आज शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. प्रीती तात्या बोभाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी सौ. प्रीती बोभाटे यांचे एकमुखी पद्धतीने स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला
ही सभा शाळेच्या मुख्याध्यापक श्री. राजेंद्र एकोणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. रमेश डोंगरे, उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम हिवरकर, ग्राम पंचायत प्रतिनिधी आणि उपसरपंच श्री. गजानन झोटिंग, तसेच शिक्षणप्रेमी श्री. मोरेश्वर डाखोरे यांनी हजेरी लावली. याशिवाय समिती सदस्य श्री. मनीष खेकारे, सौ. प्रेमिला फरकाडे, सौ. सोनाली राऊत, सौ. निता नान्ने तसेच इतर सदस्य आणि शिक्षक वर्गही उपस्थित होता.
सौ. प्रीती बोभाटे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच शाळेतील मूलभूत सोयी-सुविधा वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपल्या निवडीसाठी विश्वास दर्शविलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले,
माजी अध्यक्ष श्री. रमेश डोंगरे यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि शाळेच्या प्रगतीसाठी समितीला योग्य ते सहकार्य करण्याचे वचन दिले. त्यांनी पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी उपक्रमांचे उदाहरण देत पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली.सभेतील सदस्यांनी शाळेच्या विविध गरजांवर चर्चा केली. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिक्षणसामग्रीची व्यवस्था, तसेच खेळाच्या सुविधा यावर विशेष भर देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली,
सौ. प्रीती बोभाटे यांची निवड शाळेच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा आणखी प्रगतिपथावर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
