
राळेगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले अतिक्रमण अखेर हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असलेले सर्व अतिक्रमण हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, शुक्रवारी पहिल्या टप्प्यात बस स्थानक चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली.मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अतिक्रमण हटवण्याचे काम टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर होणार आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे, नगरपंचायत कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात आणि आगसारख्या घटनांना सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर प्रशासनाने शेवटी कडक भूमिका घेतली आहे.न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई होत असली, तरी नगरपंचायतने अंमलबजावणी सुरू केली हे निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की ही मोहीम सातत्याने सुरू राहील का? राजकीय हस्तक्षेप होऊन ती थांबवली जाईल का? राळेगाव शहर अतिक्रमणमुक्त होईल का आणि नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल का? अशीच चर्चा सध्या रंगत आहे.
