
विरार : राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. (Virar Covid Hospital fire)
आयसीयू वॉर्डात भीषण आग
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या रुग्णालयात centralized ac होता, त्याचा स्फोट झाला. त्यावेळी आयसीयूत 17 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली. एकूण 90 रुग्ण होते. फायर ऑडिट वैगरे हा मुद्दा पुढचा आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात 13 जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.
