
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा जिल्ह्यातील व हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्र संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील संत भोजाजी महाराज यांचे समाधीस्थळ ४०० वर्षापूर्वीचे असून येथे दर महिन्याला पाच लाखांवर भाविक दर्शनास, नवस करण्यास व नवस
फेडण्यास येत असतात. या ठिकाणी मराठवाडा व पश्चिम विदर्भातील यवतमाळ, नांदेड व अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या खुप मोठी आहे. परंतु वर्धा नदीवरील रोहिणी घाटावर पूल नसल्याने भाविकांना वर्धेवरून फेरा मारून यावे लागते. आता राळेगाव तालुक्यातील रोहिणी व आजनसरा यांच्या मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरील पुलाच्या बांधकामाकरिता ३८ कोटींचा निधी मंजूर झाल्याने मराठवाडा व पश्चिम विदर्भातील भाविकांना दिलासा मिळणार आहे.
संत भोजाजी महाराज देवस्थानात दररोज नैवेद्यसाठी
पुरणपोळीचा प्रसाद व पुर्ण स्वयंपाक होत असल्याने भाविकांची दर्शनास व प्रसादास गर्दी असते. यवतमाळ, नांदेड व अमरावती जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना ४० ते ५० किलोमीटरचा फेरा मारून वर्धेवरून येथे यावे लागते. निधि मंजूर झाल्याने भक्तांचा त्रास आता कमी होणार आहे.
—————
एक दशकापासून होती मागणी –
संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्त मंडळानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे, रामदास तडस यांच्याकडे एका दशकापासून सतत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत केंद्रीय निधीतून ३८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे भाविकात आनंद व्यक्त होत आहे.
—————–
पुलाच्या बांधकामासाठी ३८ कोटीचा निधी मंजूर –
पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय निधीतून ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पत्र अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांना प्राप्त झाले असून लवकरच या पुलाचे काम सुरू होणार आहे.
——————
विदर्भातील तीर्थस्थळांना जोडणार –
या परिसरात येणाऱ्या आजनसरासह हिवरा, फुकटा, वडनेर, दारोडा, येरणगाव, सिरसगाव, मणसावळी, कान्होली, राळेगाव तालुक्यातील जागजई, उंद्री, टाकळी (निधा), धानोरा, वनोजा, परसोडा, अंतरगाव या ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेऊन या मार्गावर पूल निर्मितीबाबत सतत मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेऊन विदर्भातील कळंबचे चिंतामणी, रावेरीचे देशातील एकमेव सिता मंदिर, माहूरगडाची रेणुकामाता या तीर्थक्षेत्राला अगदी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे.
—————
मराठवाडातील माहूर व किनवट मार्गे व जिल्ह्यातील घाटंजी मार्गावरील, राळेगाव ते सावंगी, कोपरी, अंतरगाव, चिखली, वनोजा, धानोरा रोहिणी व परिसरातील इतर गावे, राळेगाव ते कळम मार्गावरील बरडगाव, वाटखेड सह कळंब तालुक्यातील यवतमाळ मार्गावरील गावांना वाढती वर राहणाऱ्या वाहतुकीमुळे विविध व्यवसायाचे फायदे मिळणार आहे. या मार्गावर हॉटेल, खानावळी, कॅन्टीन, पेट्रोल पंप, धाबे सह इतर व्यवसायांना अच्छे दिन येणार आहे. प्रवासी व मालवाहू वाहने वाढून पर्यटन आदीस आणखी चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.
—————
राळेगाव, धानोरा, येवती हा दुपदरी डांबरीकरण मार्ग काही वर्षापुर्वी झालेला आहे. त्याचबरोबर धानोरा ते रोहिणी चार किलोमीटर पक्का डांबरी रस्ता तयार आहे. या होणाऱ्या नवीन पुलामुळे हिंगणघाट व नागपूरकडे जाण्याकरिता आणखी एक जवळचा मार्ग सुद्धा उपलब्ध होणार आहे.
————–
पशचिम विदर्भ व मराठवाड्यास जोडणारा पुल रोहिणी व अजनसरा मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर होत आहे. यामुळे अंतर कमी होणार असून भक्तांचा त्रास वाचणार आहे. ही महाराजांची भक्तावर कृपा आहे.
डॉ. विजय पर्वत,
अध्यक्ष
भोजाजी महाराज देवस्थान अजनसरा.
