
सहसंपादक : रामभाऊ भोयर

दी. २८-०४-२०२५ ला जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे ग्रामनाथ श्री गुरुदेव सेवा मंडळ येवतीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थातच ग्रामजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेचा परिसर हा शाळेचे विद्यार्थी तसेच सेवा मंडळाच्या कार्यकर्त्या मार्फत स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले शाळेचे मुख्याध्यापक श्री. चालखुरे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले येवती येथील सरपंच श्री. श्रीरामजी सोयाम, उपसरपंच श्री. आशिष भाऊ पारधी, ग्राम वि. का. सोसायटी चे अध्यक्ष श्री. पंकज भाऊ गावंडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. साईनाथजी भोयर, प्रतिष्ठित नागरिक म्हणून श्री. रामभाऊ कुरटकार, श्री. गिरिशभाऊ वैद्य, तसेच शिक्षणप्रेमी व शाळेच्या परिसरात आपली दैनंदिन सेवा देणारे श्री. रामाजी महाजन, व येवती येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणालीनुसार कार्यक्रमाची सुरुवात ही ” गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा ” या संकल्प गीताने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे मंडळीचे स्वागत ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी श्री. निलेश भाऊ कुबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका सौ. माकोडे मॅडम यांनी सुद्धा महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले. आणि विशेष म्हणजे मुलांना सामुदायिक प्रार्थना रोज सातत्याने करा असे सांगितले. त्यानंतर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री साईनाथजी भोयर यांनी सुद्धा आपले विचार मांडले आणि विद्यार्थांना प्रेरित केले. सरपंच श्री. श्रीरामजी सोयाम यांनी सुद्धा महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले. आणि शेवटी अध्यक्षीय भाषण शाळेचे मुख्याध्यापक श्री. चालखुरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी म्हंटले की येवती येथील माझ्या 7-8 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच असा सुंदर कार्यक्रम या शाळेत पार पडला. पुढे त्यांनी सांगितले की महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या मनात असणं हे खूप गरजेचे आहे, एवढेच नव्हे तर ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी ते आत्मसात केले पाहिजे. अशाप्रकारचे विचार सरांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले. त्यानंतर श्री गुरुदेव सेवा मंडळ येवती च्या वतीने सर्व विद्यार्थांना व उपस्थित ग्रामस्थांना सामुदायिक प्रार्थनेचे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक निखिल नक्षणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक अभिनव चौधरी यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रवंदना, व जयघोष घेऊन करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात सर्व पाहुण्यांना, विद्यार्थांना व उपस्थित सर्व ग्रामस्थांना मेजवानी म्हणून मसालेभात व मठ्ठा चे आयोजन केले होते. सर्वांनी या मेजवानीचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक विजयराव कोल्हे, राहुल गोटेफोडे, अखिलेश चौधरी, श्रीकांतभाऊ चाफले, ज्ञानेश्वर गोहने, विजय सूर्यवंशी, बाल स्वयंसेवक म्हणून श्लोक पाथरकर, प्रथमेश कुबडे, सोहम कोरांगे, गोपाल ठाकरे, आशुतोष वतनदार, पूर्वी नेहारे, पूर्वजा भागवत इत्यादी होते. तसेच येवती येथील ग्रामस्थ दामुजी जिखार, पुंडलीकराव वैद्य, डॉ. पोहदरे, अशोकराव टापरे, वृषभ दरोडे, मनोहर मराठे, विजयराव नक्षणे, प्रशांतभाऊ पोहदरे, एकनाथ चाफले, इत्यादी उपस्थित होते. या भक्तिमय वातावरणात ग्रामजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व गुरुदेव उपासक, प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद व येवती ग्रामवासियानी भरभरून प्रतिसाद दिला .
