
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गावखेड्यात अजूनही पिढ्यानपढ्या चालत आलेल्या कौलारू व मातीच्या घरांचे अस्तित्व टिकून आहे. आधुनिक काळात सिमेंट काँक्रिटच्या घरांची संख्या वाढत असली, तरी ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागांत अजूनही या पारंपरिक घरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या घरांची डागडुजी, छतांची दुरुस्ती, कौल बसविणे, फाटे बदलणे याची लगबग सध्या शिगेला पोहोचली आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता व अवकाळी वादळी पावसाची हजेरी यामुळे ग्रामीण भागातील घरमालक सतर्क झाले आहेत. अनेक ठिकाणी कौल बसवण्याचे काम, लाकडी फाट्यांची दुरुस्ती, गाळ टाकणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आजही कुशल मजुरांची वाणवा कौल बसवणे, लाकडी बांधकाम करणे, दरवाजे-चौकट फिट करणे, यासाठी पारंपरिक कौशल्य असलेले कुशल मजूर आता फारच कमी उरले आहेत. जुन्या पद्धतीने काम करणारे कारागीर दुर्मीळ झाले असून त्यांना बोलावण्यासाठी घरमालकांची धडपड सुरू आहे. परिणामी, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. काही भागांमध्ये कौल बसवण्याचे दर 700 ते 1000 रुपये प्रतिदिन इतके वाढले आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यात उबदार, उन्हाळ्यात थंड मातीच्या व कौलारू घरांची खासियत म्हणजे उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उब. ही घरे केवळ वास्तू नसून संस्कृती. परंपरा आणि गावपणाचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे ही घरे जपण्यासाठी अनेक जण प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. मात्र, या कामांत घरमालकांना मजुरांची टंचाई व वाढीव मजुरीला तोंड द्यावे लागत आहे.
काही भागांतील मातीची घरे 50-60 वर्षांची असून त्यांची दरवर्षी डागडुजी केली जाते. या घरांचे छप्पर दुरुस्त करणे,
दरवाजे चौकट बदलणे, माती आणि शेणाचा गाळ टाकणे ही कामे घरमालकांनी प्रथेनुसार सुरू केली आहेत. कौलांचे
पारंपरिक वास्तूकलेचा वारसा मातीच्या घरांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे जाणकार सांगतात. कारण ही घरे पर्यावरणपूरक असतात, उन्हाळ्यात थंडाव्याचा अनुभव देतात आणि हिवाळ्यात उबदार वातावरण निर्माण करतात. शेण-गोठा मिश्रित गाळाचे भिंतींवर लेपन केल्यामुळे ही घरे टिकाऊ होतात, तसेच निसर्गाशी सुसंगत राहतात. आजच्या काळात झपाट्याने वाढणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या घरांमुळे मातीच्या घरांची संख्या घटत असली, तरी ग्रामीण भागात अजूनही हजारो कुटुंबे या घरांवर आपले आयुष्य अवलंबून ठेवून आहेत. त्यामुळे ही घरे केवळ वास्तू नसून संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आत आपल्या घरांची डागडुजी पूर्ण करून घराच्या छताखाली सुरक्षित राहण्याची धडपड सध्या प्रत्येक घरमालक करीत आहे.दरवर्षी होणारे नुकसान बघता आता टीनपत्र्यांचा वापर प्रकर्षाने वाढला आहे.
