
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील रावेरी येथील अल्पभुधारक शेतकरी गणेश पुरुषोत्तम जामुनकर यांची युरिया करिता मागणी केली असता राळेगाव शहरातील कृषी केंद्र चालकांनी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असून, शेतकऱ्यांना वेळेवर खत न देण्याचा आरोप करत पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
शेतकरी जामूनकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी विविध कृषी केंद्रात जाऊन युरिया मागणी केली असता, सर्वच दुकानांनी गोडावूनमध्ये युरिया नसल्याचे सांगून नकार दिला. मात्र त्याचवेळी शहरातील भरवस्तीत मोठ्या प्रमाणावर खतांची बेकायदेशीर साठवणूक होत असल्याने, शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले की, अतिरिक्त पैसे दिल्यास युरिया उपलब्ध केले जात आहे, तर गरीब व अल्पभुधारक शेतकऱ्यांना खत नाकारले जात आहे.
शहरातील भरवस्तीत नियमबाह्यरित्या गोडावूनमध्ये साठवणूक केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून युरिया खताच्या काळाबाजाराला खत विक्रेत्यांकडून खुलेआम प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे सर्व कृषी केंद्रांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्यांनाच जागोजागी संघर्ष करावा लागतो कधी पावसासाठी तर कधी बियाणे किंवा खतासाठी करिता याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
