
सहसंपादक : रामभाऊ भोयर
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या जोरदार मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली राळेगाव येथे २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३३ वसंत जिनिंगजवळ शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन होणार आहे.या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग, कामगार तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष संजय दुरबुडे यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी व कष्टकरी वर्गाला केले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, “शेतीमालाला हमीभाव नाही, पिकासाठीचा खर्च प्रचंड, त्यात कर्जाचा बोजा व कुटुंबाचा वाढता खर्च – या सर्वांमुळे शेतकरी कायम कर्जबाजारीच राहतो आहे. सरकारे बदलतात, पण शेतकऱ्यांचे दु:ख कायम आहे. परिणामी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.”सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे ही काळाची गरज आहे, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. सातबारा कोरा करणे ही फक्त शेतकऱ्यांची नाही तर देशाच्या अन्नदात्याची न्याय्य मागणी असून यासाठी निर्णायक आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे.
“रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. म्हणूनच सातबारा कोरा करण्यासाठी लढा उभारावा लागणार आहे,” असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय दुरबुडे यांनी ठामपणे सांगितले.
