
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धानोरा येथे हरित संदेश आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारे दोन विशेष उपक्रम पार पडले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, धानोरा येथे शिव शक्ति युवा बहुउद्देशीय संस्था, पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात फळझाडे, सावली देणारी झाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत— “आज लावलेले हे रोप उद्याचा हिरवागार वारसा ठरेल,” असा संदेश दिला. या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार होणार असून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना दृढ होणार आहे. याच दिवशी पोलीस स्टेशन वडकी येथे ड्रग्ज मुक्त अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शिव शक्ति युवा बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्यांमध्ये गजू सुरकार, सुहास मूडे, प्रणय मूडे, विशाल वरुडकर,स्वप्नील भोयर,रोशन कापटे, रितेश येलके, स्वप्नील जुनघरे, विक्की बडवाईक, सौरभ कामडी व अंकित कामडी यांचा समावेश होता. या दोन्ही उपक्रमांमुळे धानोरा व परिसरात पर्यावरण संवर्धन, आरोग्य जाणीव आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश पोहोचला.
