
सहसंपादक : : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वनोजा येथे आज गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका ४२ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदर महिला लीलाबाई बालाजी कोडापे या आंघोळीकरिता बादलीत इलेक्ट्रिक हिटर टाकून पाणी गरम करत होत्या. पाणी गरम झाले असेल म्हणून बादलीत हात घातल्यावर त्यांना विजेचा प्रचंड धक्का बसला. लगेचच त्या खाली कोसळल्या. घराजवळील नागरिकांनी तात्काळ धाव घेत वीज पुरवठा खंडित केला आणि लीलाबाई यांना ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. मजुरी करून संसार चालवणाऱ्या लीलाबाई यांच्या पश्चात एक मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने वनोजा गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
