
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या काही दिवसांपासून राळेगाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व शेतकरी शंकर वरघट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. हे निवेदन राळेगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सलग पाच-सहा दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून काही ठिकाणी माती वाहून गेली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतीबरोबरच अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्याचे नुकसान झाले. काही घरांची पडझड झाल्याने नागरिकांवर उपजीविकेचे संकट आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित नागरिकांना तातडीने मदत आणि पुनर्वसन आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
शंकर वरघट यांनी केलेल्या या मागणीला स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते. या वेळी यश ढोकणे, गौरव राऊत, अक्षय परिसे, स्वप्निल नेहारे, सुहास उमाटे, राज नागपुरे, अंकित चौधरी, मोहित भोयर, सुमित धोटे, सुरज माणेकर, निलेश चौधरी, रोशन पयघन, करण आमटे, अमर ढोक, सचिन आत्राम, करण नेहारे, अमर कांबळे, दर्शन पाडवार, गणेश शेंडे, सुजल कुळसंगे, अमर मेश्राम, करण मेश्राम, ओम कोयरे, प्रीतम सोडे आदींसह शेतकरी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून लवकरच पाहणी होऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
