
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे दोन घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. यामध्ये ओम किशोर भुते या युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
१० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने इंदिरानगर वार्ड क्र. २ मधील जयवंताबाई मेश्राम (विधवा) यांचे घर तसेच किशोर भुते यांचे घर यांची भिंत कोसळली. भिंतीवरचे टिन पत्रे खाली पडून घरांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी भिंत कोसळल्याने किशोर भुते यांचा मुलगा ओम याच्या पायावर भिंत आदळली व त्याचा पाय मोडला.
घटना समजताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी दिलीप चिडे व तलाठी हर्ष गायकी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले. पीडित कुटुंबे अत्यंत गरीब असल्याने त्यांना तात्काळ शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.