
सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची विविध महसुली कामे मोहीम स्वरूपात पार पाडण्यासाठी “सेवा पंधरवडा” साजरा करण्याबाबत निर्देश शासन स्तरावरून प्राप्त झालेले आहेत.
सदरचे अभियान हे तीन टप्प्यात राबवावयाचे असून दिनांक 17 ते 22 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पांदण रस्ते विषयक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये शिव/पांदण रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पांदण रस्त्यांची नोंद निस्तार पत्रकात किंवा वाजीव उल अर्जात झालेली नाही त्याची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे, शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. दिनांक 23 ते 27 सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या विषयांतर्गत रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे हे काम हाती घेतले जाणार आहे. तर दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी मा विकासजी मीना यांच्या मार्गदर्शनात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम महसूल विभागामार्फत राबविले जाणार आहेत.
या सेवा पंधरवडा उपक्रमाची माहिती सर्व नागरिकांना मिळण्यासाठी दिनांक 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये राळेगाव तालुक्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर ग्रामसभेमध्ये मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील हे अभियानाची व विविध शासन निर्णयांची माहिती जनतेला देणार आहेत. यांच्यासोबतच ग्रामसभेमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व ग्रामस्तरीय कर्मचारी यांचे देखील सहकार्य घेतले जाणार आहे. तालुकास्तरीय अधिकारी यांनी देखील काही ग्रामसभांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याविषयी नियोजन करण्यात आलेले आहे.
या मोहिमे अंतर्गत राळेगाव तालुक्यात पांदण रस्ते, शेतरस्ते व शिवरस्त्यांची पाहणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, भूकरमापक हे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शिवार फेरी घेत आहेत. दिनांक 14 सप्टेंबर रोजी राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे यांनी मौजा कळमनेर व पिंपळापूर या ठिकाणी शिवार फेरी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
