
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूसह वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे मोठे जाळे उध्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12.30 वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी गाडी (क्र. एम.एच.36 एच 7288) वर्धा जिल्ह्यातून चिखली मार्गे राळेगावकडे जात असून, त्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर देशीदारूच्या पेट्या आहेत. या माहितीनुसार राळेगाव पोलिसांनी तात्काळ सावंगी (पेरका) रोडच्या वळणावर सापळा रचला.
थोड्याच वेळात माहीतीप्रमाणे तीच गाडी येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहनचालकाने पोलिसांना चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा ताबा सुटल्याने ती रोडच्या बाजूच्या नाल्यात अडकली. याचा फायदा घेत अंधारात वाहनचालक शेतशिवारामध्ये पळून गेला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला पण तो हाताशी लागला नाही.
वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये देशीदारूच्या 11 पेट्या आढळून आल्या, ज्यांची किंमत ₹41,220 इतकी आहे. तसेच क्रेटा चारचाकी वाहनाची किंमत ₹9,50,000 असून, एकूण ₹9,91,220 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चिंता साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शितल मालटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर, पोलीस अंमलदार सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे, अविनाश चव्हाण, आणि संजय शेंद्रे यांनी विशेष सहभाग नोंदविला या कारवाईमुळे राळेगाव परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
