
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून दिले. निवडून आल्यापासून खासदार देशमुख शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत. कर्जमाफीपासून ते पांदन रस्त्यांपर्यंत अनेक मागण्या त्यांनी संसदेत मांडून काही मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत.
मात्र, 10 सप्टेंबर रोजी झालेल्या अति पावसामुळे यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारने इतर जिल्ह्यांसाठी मदत जाहीर केली असताना या दोन जिल्ह्यांना वगळण्यात आल्याचे खासदार देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
नुकसानीचा आढावा:
वाशीम जिल्हा: 16,302 शेतकरी बाधित, 10,720 हेक्टर जमीन पुराखाली.
यवतमाळ जिल्हा: 3,11,000 शेतकरी बाधित, 2,34,853 हेक्टर जमीन पाण्याखाली.
या पार्श्वभूमीवर खासदार देशमुख यांनी तात्काळ राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच, राळेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, पांदन रस्ते अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या हालअपेष्टा, तसेच वरुड जहांगीर येथे मच्छी पुलावर झालेल्या अपघाताचा मुद्दा देखील त्यांनी ठळकपणे उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या खासदार संजय देशमुख यांचे मतदार बांधवांनी आभार मानले असून, “खरेच कुणीतरी शेतकऱ्यांचा कैवारी आहे” अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
पुढील काही दिवसांत राज्य सरकारने यवतमाळ-वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
