
रक्त द्या, आशा द्या : एकत्र येऊन जीवन वाचवू या”
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले. या दिवशी ऐच्छिक रक्तदात्यांचे आभार मानले जातात तसेच नव्या रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले जाते. “रक्त द्या, आशा द्या : एकत्र येऊन जीवन वाचवू या” हे या वर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य आहे.
सिकलसेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, अपघात, बाळंतपण, कर्करोग अशा विविध स्थितींमध्ये रूग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता असते.
शासकीय रक्तकेंद्र, यवतमाळमार्फत गरजू रुग्णांना सुरक्षित व शाश्वत रक्तपुरवठा केला जातो. यासाठी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत शासकीय रक्तकेंद्र, यवतमाळ येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
१८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले. रक्तदानासाठी किमान वजन ४५ किलो आणि हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅम असणे आवश्यक आहे. रक्तदान केल्याने थकवा येत नाही, उलट शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तदान करण्यापूर्वी चार तास आधी भरपूर नाश्ता अथवा जेवण करावे व नंतर भरपूर पाणी किंवा ज्यूस घ्यावा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे.
हा दिवस महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला, यावेळी विभाग प्रमुख डॉ.विकास येडशीकर, रक्त केंद्र प्रमुख डॉ.जयवंत महादनी, डॉ.दीपिका बनानी, डॉ.लोढा,डॉ. आचल लोहिया आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमा करिता महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, उपधीक्षक डॉ. दुर्गेश देशमुख, डॉ.अमर सुरजुशे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुळमेथे, या सह रक्त पेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ.हितेश भंडारी,डॉ.प्रवीण सातारकर, डॉ.साक्षी नगराळे, सर्व समाजसेवी अधीक्षक , नर्सेस,कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.