
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
पंचायत समिती च्या सभापती पदाचे आरक्षण यवतमाळ येथे जाहीर झाले असून राळेगाव पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला साठी राखीव निघाले त्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली असून या सोडतीमुळे अनेकांना परीट घड्या आता कपाटातच ठेवण्याची वेळ आली आहे. काहीतर हम नही तो सौ सही असे म्हणू लागले आहे.
राळेगाव तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट व व सहा पंचायत समिती गण असून १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे.
परंतु पंचायत समिती सभापतीचे आरक्षण पद अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षित होताच सभापतीपदाच्या खुर्चीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुक असलेल्या अनेक मान्यवरांचे मनसुभे धुळीस मिळाले आहे
विशेष म्हणजे राळेगाव नगरपंचायतीच्या २०२६ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळाली आहे तर आता पंचायत समितीच्या सभापती पद हे अनुसूचित जमाती महिला निघाले असल्याने पंचायत समिती सभापती पदी महिला विराजमान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही प्रमुख सत्ता केंद्रावर महिलाराज येणार आहे. यामुळे इच्छुक पुरुष उमेदवार अडीच वर्षाच्या वेटिंगवर राहिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नवोदित लोकप्रतिनिधी या पदावर नजर ठेवून आहेत आगामी काळात विविध राजकीय पक्षांमधील सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहे आरक्षण अनुसूचित जमाती महिला करिता राखीव झाल्यामुळे महिला तरुण आणि अनुभवी सदस्य यांच्यातही चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे राळेगाव पंचायत समितीच्या पुढील कारकीर्दीचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार याबाबत सर्वांच्याच नजरा या निवडणुकीकडे लागले आहे.
