
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसेवा आयोगामार्फत पार पडलेल्या स्पर्धापरीक्षेत राळेगाव शहरातील स्वप्निल अशोक पापडकर यांनी उल्लेखनीय यश मिळवत सहायक आयुक्त (समाजकल्याण), गट-अ या पदासाठी निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्यातून जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत त्यांनी ९ वा क्रमांक मिळवला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवून दाखवले. विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही स्वबळावर मोठे स्वप्न साकार करता येते याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले.
२०१४ साली कृषी विभागात सहायक अधीक्षक पदावर निवड झाल्यानंतर त्यांची पुढे जिल्हा परिषद गोंदिया येथे सहायक लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल राखत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि अखेर इच्छित असलेल्या वरिष्ठ पदावर आज त्यांची निवड झाली आहे.
या यशात पत्नी नलिनी, मुलगी अदिवरा तसेच आई-वडीलांचा भक्कम पाठिंबा लाभला. स्वप्नील पापडकर यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
