
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल व अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत असलेला तालुका आहे. परंतु या भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून, राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये दारू, मटका, जुगार आणि अवैध रेती वाहतूक यांसारखे व्यवसाय जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या अवैध धंद्यांचा सर्वाधिक फटका देशाचे भविष्य असणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असून, सामाजिक वातावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये “याकडे पोलीस प्रशासनचं मूक संमतीने दुर्लक्ष होतंय का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ६२ गावे असून, ५ बिट आहेत. राळेगाव शहरासह सावनेर, झाडगाव आदी मोठ्या गावांमध्ये सट्टापट्टी व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे. परवानाधारक दुकाने काही प्रमाणात नियमांचे पालन करतात; मात्र अवैध दारू विक्रेते सकाळी ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत दारू सहज उपलब्ध करून देत असल्याचे नागरिक सांगतात.
या सर्व पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गावागावातील पोलिस पाटलांकडून अवैध धंदे करणाऱ्यांची यादी तयार करून कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
अवैध धंद्यांमुळे लहान मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, सामाजिक अधःपतन टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नेते सांगत आहेत.
– गोवर्धन वाघमारे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, राळेगाव
