
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक महिला व बालकल्याण विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण आहार पुरविला जातो. मात्र राळेगाव तालुक्यातील नागरी व शहरी अंगणवाड्यांमधून पुरविण्यात येणारा कडधान्य खिचडी व शिरा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दखल घेतली असून, संबंधित आहाराचे नमुने तहसीलदार श्री. अमित भोईटे यांना दाखविण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख विजय पाटील, उपतालुकाप्रमुख प्रशांत वाहेकर, शहर संघटक योगेश मलोंडे, महिला आघाडीच्या पार्वताबाई मुखरे, शारदा चुनारकर, तसेच शंकर गायधने, सुनील सावरकर, रोशन उताणे, धनराज श्रीरामे, सुधाकर शिखरे, महादेवराव मुखरे, श्रीकांत कोदाने आदी मान्यवर उपस्थित होते.
लाभार्थी महिलांनी सांगितले की, “खिचडी शिजल्यावर मळकट वास येतो, त्यामुळे अनेकजणी हा आहार घरी नेत नाहीत. काही ठिकाणी हा आहार जनावरांना दिला जातो.” तसेच शिरा पॅकेटमध्ये बारीक अळ्या आढळल्याचेही निदर्शनास आले आहे.
या योजनेवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही गरीब लाभार्थींना अपेक्षित पोषण मिळत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी डाळ, साखर, तेल, कडधान्य स्वतंत्र स्वरूपात दिले जात होते, परंतु आता तयार मिश्रण पुरविले जात असल्याने त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“पोषण आहारात तातडीने सुधारणा न केल्यास हा निकृष्ट आहार संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडातच कोंबू,” असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विभागीय मंत्री यांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
या निवेदनावर देवराव नाखले, अनिल वैद्य (रावेरी), नागोराव कुमरे, प्रवीण राऊत, बंडू कन्नाके (राळेगाव) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
