
सहसंपादक: रामभाऊ भोयर
समग्र शिक्षण व समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी गट संसाधन केंद्र, राळेगाव येथे करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शन मा. श्री. नवनाथ लहाने, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती राळेगाव यांनी केले. शिबिरास उपस्थित दिव्यांग विद्यार्थी व पालकांना मा. श्री. लहाने तसेच मा. निलेश दाभाडे, शैक्षणिक विस्तार अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
शिबिरामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉ. रूपल कोठारी यांनी विद्यार्थ्यांची तपशीलवार वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचार व घरगुती काळजीविषयी मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या शंका आणि अडचणींचे निरसन केले.
सदर शिबिर स्थळाला मा. केंद्रप्रमुख तसेच RBSK चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बहाड यांनी भेट देऊन शिबिराचे कामकाज पाहिले. पालकांशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या समस्यात्मक प्रश्नांची उत्तरे देत समाधानकारक मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक श्री. विनोद मेंढे, श्री. राहुल पोटरकर, श्री. दीपेश शेंडे, श्री. दिपक सोळंके, श्री. सचिन वेरूळकर, श्री. चंद्रकांत मडावी, कु. माधुरी धामंदे तसेच BRC च्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले.
शिबिरामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले.
