
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यतील : कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानावर महाविद्यालयीन स्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमधे भारतीय संविधानाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच संविधान जनजागृती व्हावी यासाठी प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या हिवाळी 2025 परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
या स्पर्धेत कला व वाणिज्य शाखेतील विविध वर्गांचे एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले. यापैकी चार विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त केले. यामधे बी ए भाग 2 ची विद्यार्थिनी कु. प्रणाली प्रमोद परचाके हिने 40 मिनिटांत १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. बी ए भाग 1 चा विद्यार्थी कार्तिक दिलीप रेवडे याने 55 मिनिटांत १०० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक मिळवला. तर, बी ए भाग १ चा विद्यार्थी सक्षम संजय वाघमारे याने 56 मिनिटांत १०० टक्के गुण प्राप्त करीत तृतिय क्रमांक मिळवला.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल दौलतकार, समाजशास्त्र विभागाचे प्रा. प्रविण शेंद्रे वाणिज्य विभागाचे प्रा. रुपेश पवार व प्रा. विशाल कातडे यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन प्रश्नमंजुषा परिक्षेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव सावरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, अभ्यासाची आवड व सामाजिक बांधिलकी दृढ करणारा ठरला.
