
सहसंपादक: रामभाऊ भोयर
मागील वीस वर्षांपासून अत्यल्प मानधनावर सेवा देणाऱ्या समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा उभारला आहे. 8 डिसेंबर पासुन नागपूर हिवाळी अधिवेशनात बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. राळेगाव तालुका व यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन नागपूर विभागीय अध्यक्ष प्रशांत लांबट यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ८ डिसेंबर पासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समग्र शिक्षा संघर्ष समिती ने आमदार महोदयांना पत्र लिहून, शासन सेवेत समायोजन करून कायम करण्याची शिफारस करावी, अन्यथा ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मागील २० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा
तीव्र लढा उभारला जात आहे. समग्र शिक्षा योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करून कायम करावे, शासन सेवेत कायम न केल्यास ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी द्यावी याप्रमूख मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनादरम्यान, कर्मचारी अन्नत्याग आंदोलन, शंखनाद, थाळीनाद, घंटानाद, टाळनाद, आक्रोश, भीकमागो, मूक आंदोलन आणि आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर सहाव्या दिवसापासून कुटुंबातील सदस्यांसह (मुले, बाळे) आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही समितीने दिला आहे. यासाठी जिल्हाभरातून समग्र शिक्षा संघर्ष समितीचे पदाधिकारी पूढाकार घेत आहेत.
