
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा–अंधारी नदी घाटावरील रेतीउपसा आणि वाहतूक व्यवसायातील सुरू असलेला वाद आता गंभीर गुन्ह्यात परिवर्तित झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेता वैभव कुशाबराव पिंपळशेंडे (वय ३०, रा. चेक ठाणेवासना) यांच्यावर खंडणी, धमक्या आणि दडपशाही प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईनंतर पोंभुर्णा परिसरातील रेतीघाटावरील राजकीय हस्तक्षेप, स्थानिक माफिया संस्कृती आणि पैशाच्या व्यवहारांची गुप्त साखळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
फिर्यादीकडून २.४३ लाखांची जबरदस्ती खंडणी?
फिर्यादी शिवकुमार शंकर कोरेवार (वय ४०, रा. रामनगर) यांनी तक्रारीत सांगितले की—
त्यांनी चेक वेळवा रेतीघाटाचा दोन वर्षांचा ठेका घेतला होता.
त्यानंतर वैभव पिंपळशेंडे यांनी सतत अडथळे, काम थांबवण्याच्या धमक्या,
“घाट बंद पाडतो… जिवंत सोडणार नाही!”
अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.
विविध तारखांना ऑनलाइन स्वरूपात १,४३,००० रुपये,
तर सुपरवायझरकडून १,००,००० रुपये रोख
अशी एकूण २,४३,००० रुपयांची रक्कम जबरदस्तीने उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपने जिल्हा हादरला
घटना उघडकीस येण्याआधीच पिंपळशेंडे आणि कोरेवार यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती.
त्यात —महिलांसंबंधी अश्लील शिविगाळ जीवे मारण्याची धमकी
“कोणालाही विचारत नाही, उडवून टाकतो!”
अशा स्पष्ट वाक्यांमुळे पोलिसांसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
ऑडिओ क्लिपची चर्चा तापलेली असतानाच आता खंडणीच्या गंभीर प्रकरणाने घटनाक्रम पूर्णपणे बदलला आहे.गावात आधीच तक्रारी, कुटुंबातील सदस्यांवरही कारवायांची चर्चा
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळशेंडे यांच्याविरुद्ध अशाच स्वरूपाच्या तक्रारी पूर्वीही झालेल्या आहेत.
तसेच—
त्यांच्या घरातील सदस्यांवर शैक्षणिक संस्थेतील गैरव्यवहार,अवैध वाळू–मुरूम व्यवसायातून पैसा उकळणे,श्रमिकांवर दडपशाही आणि मारझोड,शेतकऱ्यांसाठीच्या शासन योजनांचा गैरवापर,असे अनेक मुद्दे स्थानिकांमध्ये चर्चेत आहेत.
यामुळे नागरिकांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण केवळ खंडणीपुरते नसून रेती माफिया नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याची मोठी संधी आहे.पुढील तपास निर्णायक ठरणार
रामनगर पोलिसांनी तक्रार मिळताच तत्काळ गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपासात— ऑडिओ पुरावे,आर्थिक व्यवहार,ऑनलाइन पेमेंटचे रेकॉर्ड,संबंधित व्यक्तींची जबाबदारी हे सर्व तपासाचे महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.
प्रकरण स्थानिक राजकीय वर्तुळाशी थेट जोडले गेले असल्याने —
तपास कोणत्या दिशेने जातो?
आणखी कोणत्या अटकांची साखळी समोर येते?
याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पोंभुर्णा परिसरात निर्माण झालेल्या वातावरणामुळे रेती तस्करी, राजकीय हातखंडे आणि वर्चस्वाच्या खेळाला आता खरेच आळा बसेल का? हा मोठा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे
