
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ :- गोंड आदिवासी समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या फोरो पठार धनेगाव (कोयली कचारगड) येथे दरवर्षी होणाऱ्या पेनजत्रेदरम्यान सेवा, स्वच्छता, शिस्त व संरक्षणाची जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडणाऱ्या कचारगड सेवा दलाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत गोंडवाना जंगोम दलाच्या प्रदेशाध्यक्षा कु. सुवर्णा वरखडे यांनी व्यक्त केले.कचारगड येथे देशभरातून हजारो आदिवासी बांधव दर्शनासाठी येतात. या मोठ्या जनसमुदायात शिस्त राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे, ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच कचारगडच्या पवित्रतेची जपणूक करणे—ही महत्त्वाची जबाबदारी कचारगड सेवा दलातील आदिवासी युवक दरवर्षी समर्थपणे पार पाडत आहेत.कचारगड सेवा दल हे केवळ स्वयंसेवकांचे संघटन नसून, आदिवासी अस्मिता, संस्कृती व स्वाभिमानाचे रक्षण करणारे एक सामाजिक आंदोलन असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणताही मोबदला न घेता समाजासाठी स्वतःचा वेळ, श्रम व ऊर्जा अर्पण करणारे हे युवक आजच्या पिढीसाठी आदर्श ठरत आहेत.आज आदिवासी समाजासमोर सांस्कृतिक अतिक्रमण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक एकतेला धोका निर्माण करणारी आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत युवकांनी केवळ प्रेक्षक न राहता समाजरक्षणासाठी पुढे येणे आवश्यक आहे, असे मत कु. सुवर्णा वरखडे यांनी व्यक्त केले.कचारगड वाचवणे म्हणजे आपली ओळख वाचवणे आहे.सेवा हीच खरी पूजा असून, युवकांचे संघटन हीच समाजाची खरी ताकद आहे,” असे त्या म्हणाल्या.
सेवा – संस्कृती – स्वाभिमान या त्रिसूत्रीवर कार्य करणारे कचारगड सेवा दल संपूर्ण आदिवासी समाजासाठी आशेचा किरण ठरत असून, आदिवासी युवकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन कचारगड सेवा दलात सहभागी व्हावे व आपल्या पूर्वजांच्या पवित्र वारशाचे रक्षण करावे, असे कळकळीचे आवाहन कु. सुवर्णा वरखडे यांनी केले.
