
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
ध्येयवेड्या शिक्षिका सपना वासे असाही प्रवास
नागपूर – रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनेवानी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका सपना प्रशांत वासे यांनी ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचा लळा लागावा त्याअनुषंगाने शाळा बोलकी असावी, त्यातुन शिकण्याची प्रक्रिया सहजपणे व्हावी आणि मुलांच्या दैनंदिन हजेरीत वाढ व्हावी या उद्देशाने कर्ज घेऊन संपुर्ण शाळेची रंगरंगोटी केली.
खरतर जिप शाळांना अनुदान हे शाळेच्या पटसंख्येनुसार मिळत असते. ग्रामीण व आदीवासी भागातील जि.प. शाळांची पटसंख्या ही गावच्या लोकसंख्येवर आधारीत असताना मिळणारे अनुदान आणि कामाचा पसारा ह्यात बऱ्याच गोष्टी शाळेसाठी करणे शक्य होत नाही.
ह्या गोष्टीचा सारासार विचार करून आणि कोणाकडूनही आर्थिक मदतीचा विचार न करता स्वतः५० हजारांचे कर्ज घेऊन शाळेची एका आठवड्यात खुप सुंदर आणि आकर्षक रंगरंगोटी पुर्ण केली.
त्यांच्या ह्या उपक्रमाने शाळेचा चेहरामोहरा बदललेला असून जुनेवानी ची शाळा आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेली आहे. सपना वासे यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत असून जि.प.सदस्या शांताताई कुंभरे , पं.स.रामटेक गटशिक्षणाधिकारी संगिता तभाणे, म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष आशुतोष चौधरी आणि इतर पदाधिकारी – अधिकारी यांनी विशेष दखल या उपक्रमाची घेतलेली आहे.
सपना वासे या नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात. शैक्षणिक उपक्रमासह सामाजिक उपक्रमातही त्यात अग्रणी असुन याअगोदरही मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केलेला आहे हे विशेष.
